माजी नगराध्यक्ष चौधरी यांचे नाट्यरसिकांना आवाहन
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये नव्याने बांधलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरामध्ये होणाऱ्या नाट्यकलाकृतींना रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी नाट्यरसिकांना केले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून मागील वर्षी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दिग्गज नाट्यकलावंताच्या उपस्थितीमध्ये मागील वर्षी दिवाळीच्या सुमाराला दिमाखदार उद्घाटन झाले होते. उद्घाटनाच्या वेळी दररोज 10 दर्जेदार नाटकांची मोफत मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या नाटकांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. याची आठवण श्री. चौधरी यांनी करून दिली.
मात्र गेल्या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत नाट्यमंदिरात झालेल्या नाट्यप्रयोगांना नाट्य रसिकांचा अल्प प्रतिसाद लाभल्याची खंत श्री. चौधरी यांनी व्यक्त केली. अशीच परिस्थिती राहिल्यास नाटके पहाण्याची कमी संधी मिळेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
नाट्यगृहातील पार्किंगची व्यवस्था सुरू आहे. काही नाटकांचे दर जास्त आहेत त्यामुळे नाट्यगृहाचे भाडे आकारणी कमी करण्याची मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली होती. तिकीट दराबाबत योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ डागडुजी आणि देखभालीमुळे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. 25 जूनपासून नाट्यगृह सुरू होणार असून 27 जून रोजी भ्रमाचा भोपळा या नाटकाचा प्रयोग होणार आहे, या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन श्री. चौधरी यांनी केले आहे.