नांदेड : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा काही तासांवर आला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी बॅनर झळकावले जात आहेत. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरला आहे. रघुपती राघव राजाराम असे लिहून चव्हाण यांनी नांदेड शहरात बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे स्वतः चे फक्त नाव त्यांनी त्यावर टाकले असून माजी मुख्यमंत्री पदाचा किंवा काँग्रेसच्या कुठल्याही पदाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चर्चाना उधाण आलेलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा अनेकांनी केला होता. त्यातच आज हे बॅनर पहायला मिळाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. एरव्ही सत्य साईबाबांचे भक्त असलेले चव्हाण फारसे देव धर्माच्या बाबतीत फारसे सक्रिय नसतात. मात्र अयोध्येच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी केलेली बॅनरबाजी राजकारणात उलथापालथ घडवणारी ठरते की काय अशी चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते गिरीश महाजन यांनी 15 दिवसात राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडून कोणत्याही पदाच्या उल्लेखाशिवाय बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडून नांदेडमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो आहे. तर, त्यासोबत रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान या महात्मा गांधी यांच्या भजनातील ओळी नमूद करण्यात आल्या आहेत. तर, बॅनरवर अशोक शंकरराव चव्हाण हे एकमेव नाव नमूद करण्यात आले आहे. या नावाखाली कोणत्याही पदाचा उल्लेख नाही. अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नावानंतर कोणत्याही पदाचा उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात ठिकठिकाणी रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले जात आहेत. या बॅनरवर नेत्यांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची गर्दी सर्वाधिक दिसते. तर, त्या तुलनेत अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर प्रभू राम वगळता इतर कोणाचाही फोटो नाही. त्यामुळेही अशोक चव्हाण यांच्या बॅनरची चर्चा सुरू आहे.