जलवाहिनी पुन्हा फुटली; ५० टक्के पाणीकपात

ठाणे: मागील तीन दिवसांपासून ३० टक्के पाणी कपातीची झळ सोसणार्‍या ठाणेकरांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. टेमघर येथून पाणीपुरवठा करणारी वाहिनी पुन्हा फुटल्यामुळे आता ठाणेकरांना ५० टक्के कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा होणार असून त्याचा फटका घोडबंदर, लोकमान्य नगर, सावरकरनगर, वर्तकनगर, उथळसर आणि काही प्रमाणात कळवा येथील रहिवाशांना बसणार आहे.

पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मि. मि व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथील महानगर गॅसचे काम सुरू असताना ६ डिसेंबरला जलवाहिनीला हानी पोहचली होती. त्यामुळे ११ डिसेंबरपर्यंत शहरामध्ये ३० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली. या कपातीची मुदत संपत असतानाच गुरुवारी पुन्हा दुसर्‍या ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी अजून चार दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.

टंचाईमुळे कासावीस झालेल्या घोडबंदरवासियांना या कपातीची सर्वाधिक झळ पोहचणार आहे. याशिवाय लोकमान्य, सावरकरनगर, वर्तकनगर भागातही पाणी टंचाई निर्माण होणार आहे. मात्र या भागांमध्ये दिवसातून एकदा १२ तासांनी झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच जेथे सर्वाधिक टंचाई निर्माण होईल तेथे मागणीनुसार ठाणे महापालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.