अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला

शरद पवार यांना मोठा धक्का

मुंबई : गेल्या सहा महिन्यांत झालेल्या १० हून अधिक सुनावणींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह बहाल केले आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना पक्षात फूट पडून अभूतपूर्व परिस्थितीनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण बहाल केला होता. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह सोपवल्याने निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचे? हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला होता. गेली सहा महिने यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. या सुनावण्यांसाठी स्वत: शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहायचे तर अजित पवार यांच्या गटाच्या वतीने सुनील तटकरे आणि इतरही महत्त्वाचे नेते सुनावण्यांसाठी हजर असायचे. अखेर सहा महिन्यांच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आपण नम्रपणे स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तर निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे.

शरद पवार गटाला तीन पर्यायी चिन्हे पाठवण्यासाठी ७ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येतोय. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे.

बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सांगण्यात आले होते. महाराष्ट्रातले ४१ आमदार आणि नागालँडमधील सात आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे. तसेच लोकसभेतील दोन खासदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे तर एका खासदाराने दोन्ही गटाला शपथपत्र दिलेले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पाच आमदारांनी दोन्ही गटाकडून शपथपत्रे दिलेली आहेत. हेच सार लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा आता पर्याय असेल.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पक्षचिन्ह आणि निशाणी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की अजितदादा पवार यांच्यावर राज्यातील जनतेचा विश्वास आहे म्हणूनच त्यांच्याबरोबर विधी मंडळातील ४० आमदार आणि खासदार आहेत. त्या जोरावर निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले आहे. हा सत्याचा विजय आहे असे ते म्हणाले.