नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी फळ बाजारात मागील काही वर्षापासून थंडीच्या हंगामात आफ्रिकेमधील मलावी आंबा दाखल होत असतो. त्यानुसार नुकताच टॉमी अटकिन्स प्रजातीचा आंबा दाखल झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना कोकणातील हापूसच्या हंगाम पूर्व परदेशी हापूसची चव चाखायला मिळत असल्याने ग्राहकांकडून या आंब्याला पसंती दिली जात आहे.
भारतातून विशेषतः कोकणातील हापूस आंब्याला परदेशात खूप मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे परदेशी फळांना देखील भारतीय बाजारात मागणी असते. एपीएमसी बाजारात फेब्रुवारीपासून देशी हापूसचा हंगाम सुरू होतो. गेल्या काही वर्षांपासून थंडीच्या मोसमात आफ्रिकन मलावी आंबा दाखल होत आहे. हा आंबा चवीला कोकणातील हापूससारखाच असल्याने याला पसंती दिली जात आहे.
यंदा बाजारात टॉमी प्रजातीच्या हापूसच्या ५४० पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. हा आंबा आकाराला मधुर असून त्याचा रंग लाल आहे. वजनाला अंदाजे ४०० ते ५०० ग्राम असून बदामी रंगाचा आहे. एका पेटीला २५०० ते २७०० दर आहे. बाजारात दाखल झालेल्या ५४० पेट्यांपैकी २०० पेट्या दिल्ली, १०० पेट्या हैदराबाद आणि ५० पेट्या बंगलोर येथे रवाना झाल्या आहेत. उर्वरित आंबा मुंबई उपनगरात विकला जात आहे.
सध्या आंब्याचा मुख्य हंगाम सुरु नसला तरी लग्न सराईत या आंब्याला अधिक मागणी आहे. हा आंब्याचा हंगाम दोन महिने बाजारात चालणार आहे, अशी माहिती फळ व्यापारी चिन्मय पानसरे यांनी दिली आहे.