समाज माध्यमांवर व्हिडीओ टाकून केला संताप व्यक्त
ठाणे: घोडबंदर मार्गावरील खड्डे आणि नेहमीच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांनी प्रशासनापुढे हात टेकले असतानाच छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील मराठी कलाकारांनी देखील जाहीरपणे संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या समस्येचा फटका बसलेल्या अभिनेत्री रुपाली भोसले यांनी देखील सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करून प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. यापूर्वी देखील त्यांनी ठाण्यातील खड्ड्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
घोडबंदर रस्त्यावर मागील काही दिवसांपासून सुरु असलेली वाहतूक कोंडी तसेच रस्त्याच्या दुरावस्थेची समस्या गंभीर बनली आहे. याचा फटका सर्वसामान्यांनासह आता सेलिब्रेटिंनाही बसू लागला आहे. आई कुठे काय करते या टीव्ही मालिकेतील मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच सोशल मिडियात एक व्हिडिओ शेअर करत घोडबंदर रस्त्याच्या स्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘घोडबंदर रस्त्याची काय अवस्था आहे, किती वर्षे असा प्रवास करायचा ?’ असा सवाल तिने उपस्थित केला आहे. रूपाली भोसले हिने यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी विरारहून ठाण्यापर्यंत सतत प्रवास केला होता. त्या काळातही घोडबंदर रस्त्यावर खड्ड्यांचेच साम्राज्य होते आणि प्रवास त्रासदायक होता. आजही तीच परिस्थिती असून परिस्थितीत काहीही बदललेली नाही अशी संतप्त टीका भोसले यांनी केली.
रात्रभर शूटिंग करून शनिवारी सकाळी ५:३० वाजता घरी निघाले, तर घोडबंदर रोडवर आधी ट्रॅफिक आणि मग हा असा सुंदर रस्ता”, १२-१४ तासांचे शूट आणि त्यानंतर दोन तास असा प्रवास… हे नीट कधी होणार?” असा सवाल रुपालीने उपस्थित केला आहे.
रूपाली भोसले यांच्या आधी देखील अनेक कलाकारांनी अशाच प्रकारच्या पोस्ट शेअर करत ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त केली होती.