* आमदार संजय केळकर यांचा अधिवेशनात आरोप
* मँग्रोज उद्ध्वस्त करून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
ठाणे : ठाणे-वसईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला मोठा खाडी किनारा लाभला असून संरक्षक भिंत असलेल्या कांदळवनाचा ऱ्हास संबंधित विभागांच्या टोलवाटोलवीत होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना कांदळवनाबाबत तक्रारींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
ठाणे महापालिका हद्दीला लागून मोठा खाडी किनारा असून येथील कांदळवन संरक्षक भिंतीची भूमिका बजावत असते. मात्र कांदळवन साफ करून तेथे, अनधिकृत इमारती, मैदाने, टर्फ, उभे राहत असून डेब्रिजही मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली आहे. यावर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या असता महापालिका महसूल विभागाकडे बोट दाखवते तर महसूल विभाग कारवाईचा चेंडू वन विभागाकडे ढकलतो. या टोलवाटोलवीत कांदळवन उद्ध्वस्त होत असल्याची टीका श्री.केळकर यांनी अधिवेशनात केली तर कांदळवन नक्की कोणत्या विभागांतर्गत येते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कांदळवनाचे संरक्षण आणि जतन करण्याबाबत आदर्श नियमावली तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी सद्यस्थिती पाहता तसे दिसून येत नाही. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा या संदर्भात समन्वयाचा अभाव दिसत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदळवनाचा ऱ्हास करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी काही नियोजन केले आहे का? असा प्रश्नही श्री.केळकर यांनी उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की कांदळवनाचा स्वतंत्र सेल असून राज्यात किनारपट्टी भागात सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रफळावर मॅनग्रोज असून त्यातील ३८२४ हेक्टर क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. कांदळवन उद्ध्वस्त झाल्याच्या तक्रारी असतील तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे, पंकजा मुंडे म्हणाल्या.
बाळकुम, कोलशेत आणि दिव्यात खाडीतील कांदळवन नष्ट करून मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. यावर पर्यावरण विभागाकडून कारवाई होणार असल्याने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.