ठाणेकरांचा मुंबई प्रवास होणार सुखकर आणि वेगवान; माजिवडा-मुलुंड मार्गाच्या दुरुस्तीसाठी निघाली निविदा

ठाणे: ठाण्यातील माजिवडा येथील गोल्डन डायस जंक्शन ते मुलुंडमधील जुन्या जकातनाका दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती होणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाणेकरांचा मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास सुखाचा होणार आहे.

मुंबईला ठाण्याशी जलद रीतीने जोडणा-या पूर्वद्रुतगती महामार्गावरील बराचसा भाग खराब झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील ठाणे शहराच्या रस्त्यावर लहान खड्डे पडले आहेत. शिवाय स्त्यावरील आच्छादन उखडल्यामुळे ट्रेलर्स, ट्रक, टेंपो आदी वाहने रस्त्यावर आदळून त्यांचा आवाज दिवसरात्र येत आहे. विशेषत: सायंकाळपासून पहाटेपर्यंत मोठ्या वाहनांचा आवाज सुरु असल्याने स्थानिक इमारतींमधील रहिवाशांची झोपमोड होत असते.

ठाण्यातील माजिवडा ते मुलुंड जुना जकात नाका दरम्यानच्या पाच किलोमीटर रस्त्याची सखोल दुरुस्ती सुरू होणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिका-यांनी सांगितले होते. यास आता दोन वर्षे उलटली आहेत. त्यामुळे महामार्गाची दुरुस्ती झालीच नाही,असे स्थानिकांनी सांगितले. ठाण्यातून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे संपणा-या 23.55 किलोमीटर लांबीच्या पूर्व द्रुतगती महामार्गाची उभारणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केली होती. या मार्गासंबंधी टोल वसुली ही एमएसआरडीसीच करत आहे. मात्र या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी बृहन्मुंबई महापालिकेकडे आहे. 2017 नंतर या मार्गाचा वापर करणा-या वाहनांकडून टोल वसुली एमएसआरडीसीकडून होणे प्रस्तावित आहे. या स्थितीत ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. मुंबई महापालिकेचा जुना जकात नाका हा ठाणे महापालिका व मुंबई महापालिकेच्या हद्दीवरील ‘हरिओम नगर’जवळ आहे. हा रस्ता नीट झाल्यास या मार्गावर गर्दीच्या वेळी होणा-या वाहतूक कोंडीपासून वाहनांची आणि स्थानिक इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांची खडखडाटाच्या अवजपासून मुक्तता होणार आहे. मात्र, यासाठी दोन कोटी 68 लाख 16,164 रुपये खर्च होणार असून काम पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.