ठाणेकरांना मिळणार २० मिनिटात रुग्णवाहिका

ठाणे: ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता करोना काळाप्रमाणेच भाडेतत्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांना पंधरा ते वीस मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकेल, असा दावा करण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. शहराच्या विविध भागात ३३ आरोग्य केंद्र, सहा प्रसुतीगृह आहेत. प्रसुतीगृहात गरोदर महिला दाखल होतात. परंतु अनेकदा उपचाराकरीता किंवा काही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना कळवा येथील रुग्णालयात पाठविण्यात येते. काही वेळेस कळवा रुग्णालयातून रुग्णांना आणि गरोदर महिलांना मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येते.

या रुग्णांच्या वाहतुकीसाठी पालिकेच्या ताफ्यात सहा रुग्णवाहिका तर, पाच कार्डियाक रुग्णवाहिका असून त्या १२ ते १५ वर्षे जुन्या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका नादुरुस्त होणे, बंद पडणे, असे प्रकार वारंवार घडत असतात. तसेच ज्या रुग्णवाहिकेचे आर्युमान १५ वर्षे पूर्ण झालेले आहे, त्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार, ठाणे शहराबाहेर पाठविता येत नाहीत. याशिवाय, ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या पुढे गेली असून त्या तुलनेत पालिकेच्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या अपुरी पडत आहे.

करोना काळात रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्यानंतर पालिकेला रुग्णवाहिका सेवा पुरविणे शक्य होत नव्हते. या टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने खासगी रुग्णवाहिका भाडे तत्वावर घेऊन त्याद्वारे रुग्णांची वाहतूक केली होती. करोना काळात रुग्णवाहिकेचे महत्व समोर येऊनही त्यानंतर पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पालिकेच्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची सुविधा अपुरी पडत असल्याची बाब लक्षात येताच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांनी रुग्णवाहिका भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावास महापालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली आहे. यानुसार, पालिकेला वर्षाकाठी ३ कोटी ८० लाख ९९ हजार ६५८ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

एक रुग्णवाहिका खरेदीकरिता किमान ६० लाख रुपयांचा खर्च येतो. या रुग्णवाहिकेची निगा व देखभाल, गाडीचा विमा, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी, इंधन खर्च, रुग्णवाहिकेवर चार चालक ठेवणे गरजेचे असते. या सर्व बाबींचा विचार करता एका रुग्णवाहिकेकरीता कमीतकमी ८० ते ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याऐवजी खासगी रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेतल्यास एका फेरीचा खर्च ७५०० ते ५५०० इतका होईल आणि हा खर्च कमी असेल. यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

रुग्णवाहिकेसाठी चोवीस तास हेल्प लाईन सेवा देण्यात येणार आहे. अतितात्काळ परिस्थितीत अत्यंत महत्वाच्या व्यक्तींकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल. रुग्णवाहिकेची थेट वेळेतील स्थिती पाहणे (रिअल टाईम ट्रॅकिंग करणे) शक्य होईल. संपूर्ण ठाणे शहराकरीता एकाच दराने रुग्णवाहिका उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेस कॉल गेल्यानंतर रुग्णवाहिका १५ ते २० मिटिनांमध्ये उपलब्ध करुन घेणे शक्य होईल, असे मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.