ठाणेकरांनी बंडखोरांना दाखवला कात्रजचा घाट

१९ पैकी १८ बंडखोरांचा पराभव

ठाणे: महायुती झाल्याने अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करीत १९ जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापैकी १८ जणांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, एकमेव अपक्ष प्रमिला केणी यांनी विजय मिळवला.

ठाणे महापलिका निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि भाजप स्वतंत्र लढतील, असा अंदाज असल्याने दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी नेत्याकडे ही लावली होती. तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव करत उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली होती. मात्र, ऐनवेळी भाजप आणि शिंदेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही पक्षाला जागा वाटपात अपुऱ्या जागा आल्या. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची यावरून देखील पेच निर्माण झाला होता. अशातच अनेक इच्छुक व माजी नगरसेवकांना तिकीट मिळणार असा विश्वास होता, त्यांचा देखील हिरमोड झाला. अनेकांनी सपत्नीक निवडणुकीची तयार देखील सुरु केली होती. मात्र, पक्षाकडून घरात एकालाच उमेदवारी देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे दिसून आले. त्यामुळे नाराज झालेल्या इच्चुकांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील ११ तर, भाजपाच्या सात जणांचा समावेश होता. या सर्व बंडखोरांना मतदारांनी नाकारल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग २३ मधून प्रमिला केणी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात अर्ज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने त्यांना पुरस्कृत जाहीर करीत, त्यांच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. शुक्रवारी मतमोजणीत प्रमिला केणी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

 

काँग्रेस-मनसेचे शहर अध्यक्ष पराभूत

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि मनसेचे शहराध्यक्ष पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी स्वबळावर ६६ उमेदवार उभे केले होते. तसेच, ते स्वतः वर्तकनगर प्रभाग ७ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र भाजपच्या वैभव कदम या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.मनसेने २८ जणांना उमेदवारी दिली होती. त्यात पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांचाही समावेश होता. मोरे यांचा भाजपच्या मनोहर डुंबरे यांनी पराभव केला. काँग्रेस आणि मनसे पक्षाचा एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांच्या सफाया झाला आहे.