नंदू नाटेकर स्मृती राज्य अजिंक्यपद स्पर्धा
ठाणे: आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ठाणेकर संघाने पुरुष आणि महिला संघाने घवघवीत यश मिळवल्यानंतर योनेक्स सनराइज कै. नंदू नाटेकर स्मृती राज्य अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक वरिष्ठ गटात पुन्हा एकदा ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी १२ पदके पटकावली. नुकत्याच मुंबई येथील गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या योनेक्स सनराइज कै. नंदू नाटेकर स्मृती राज्य अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ गटात राज्यभरातून 500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या वरिष्ठ गटात एकूण पाच इव्हेंट्स पैकी चार इव्हेंट्समध्ये पदकांची लयलूट करून ठाणेकर खेळाडूंनी आपले वर्चस्व राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा एकवार कायम ठेवले आहे. मिश्र दुहेरी गटात राज्यातीलच नव्हे तर देशातील नावाजलेली जोडी दीप रांभिया आणि अक्षया वारंग यांनी सर्वोत्तम खेळाचे सादरीकरण करीत सुवर्णपदक पटकावले आहे. पहिल्या फेरीपासूनच आक्रमक खेळाचे सादरीकरण करीत या जोडीने उपउपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीत त्यांचा सामना सोहम पाठक आणि ठाणेकर खेळाडू इशिता कोरगावकर यांच्यासोबत होता. दीप आणि अक्षया यांनी या जोडीला 21-14, 21-16 असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना ठाणेकर जोडी अनघा करंदीकर आणि अमन फारोघ संजय यांच्याशी होता. या सामन्यात दीप आणि अक्षया यांनी 21-15, 21-15 अशा सेटमध्ये विजय मिळवला आणि अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. अंतिम फेरीत त्यांनी विराज कुवळे व ठाणेकर खेळाडू सिया सिंग या जोडीचा 21-19,21-13 असा सहज पराभव करीत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
महिलांच्या दुहेरी गटात अनघा करंदीकर आणि सिया सिंग या नवनिर्वाचित ठाणेकर जोडीने उत्तम खेळाचे सादरीकरण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम सामन्यात अनघा आणि सिया या जोडीने कशिका महाजन आणि सिमरन सिंघी या जोडीचा 21-17 21-17 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत पुरुष दुहेरीत अभ्युदय चौधरी आणि झेको सेइ या ठाणेकर जोडीने कांस्यपदक पटकावले आहे. तर कबीर कंझारकर हा देखील कांस्यपदकाचा मानकरी ठरला आहे.
महिला एकेरीत प्रथमच वरिष्ठ गटात पदार्पण करणाऱ्या ठाणेकर बॅडमिंटन पटू आर्या कोरगावकर हिने रौप्य पदक पटकावण्याची किमया साध्य केली आहे. याच गटात सिया सिंग हिनेदेखील कांस्यपदक पटकावले आहे.
यापुढे देखील आपण व आपली ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची संपूर्ण टीम महाराष्ट्र राज्याचे तसेच ठाणे जिल्ह्याचे नाव बॅडमिंटन क्रीडा विश्वात अजून मोठे करू असे आश्वासन शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते व ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी व्यक्त केले. या घवघवीत यशात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर मितेश हजीरनिस, श्रीकांत भागवत यांच्या समवेत विघ्नेश देवळेकर, कबीर कंझारकर आणि संपूर्ण टीमचा सिंहाचा वाटा असल्याचे क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.