पुण्याचा धर्मेंद्र आणि नाशिकच्या रविनाची ठाणे मॅरेथॉनवर मोहोर

तब्बल सहा वर्षांनी ठाणे वर्षा मॅरेथॉन धावली

* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा धावले
* २५ हजारहून अधिक स्पर्धक सहभागी

ठाणे:’मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या एएसआयच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले. त्याने ०१ तास ०७ मिनिटे आणि ४१ सेकंद वेळेसह २१ किमीचे अंतर पार केले. तर, महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी एक तास २५ मिनिटे आणि ४६ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. तर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.

कोरोनापासून गेली पाच वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला.

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला.

ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू होत आहे. त्यामुळे ठाण्याचे रुप आणखी बदलेल. आपले ठाणे हरित होत आहे. यंदा दोन लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी, इंग्लड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषी आखाडे, आयुष तावडे, मानव मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, आतंरराष्ट्रीय ॲथलिट शौर्या अंबुरे आणि फुल्ल आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटात झाली. विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

पुरुषांच्या खुल्या गटाच्या २१ किमी अंतराच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पुण्याच्या धर्मेंद्र याने पटकावला. द्वितीय अंकुश हक्के, सांगली तर तृतीय क्रमांक कमलाकर देशमुख, नाशिक यांनी पटकावला. त्यानंतर पहिल्या दहा क्रमांकात बेलिअप्पा एपी, एसएसआय, पुणे, सचिन यादव, मुंबई उपनगर, राज तिवारी, मुंबई, इश्वर झिरवाल, नाशिक, धुलदेव घागरे, सांगली, अमोल अमुने, सोलापूर आणि सिद्धेश बर्जे, रत्नागिरी यांचा समावेश आहे.

महिलांच्या खुल्या गटाच्या २१ किमी अंतराच्या स्पर्धेत प्रथम रविना गायकवाड, नाशिक, द्वितीय आरती पवार, नाशिक, तृतीय साक्षी जड्याल, रत्नागिरी यांच्यासह पहिल्या दहा क्रमांकात ऐश्वर्या खलाडकर, पुणे, रुक्मिणी भोरे, पालघर, अभिलाषा मोडेकर, पुणे, प्रियांका पैकाराव, ठाणे, प्रतिक्षा चोरमले, मुंबई, आंचल मारवा, मुंबई आणि उर्मिला बने, मुंबई यांचा समावेश आहे.

पुरुषांच्या १८ वर्षावरील गटाच्या १० किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांमध्ये चैतन्य रुपनेर, सांगली, अतुल बरडे, नाशिक, वैभव शिंदे, नाशिक, आशुतोष यादव, मुंबई, प्रतिक डांगरे, पालघर, मन्नू सिंग, ठाणे, हितेश शिंदे, मुंबई, हर्षा चौहान, मुंबई, दत्ता आढाव, परभणी आणि सूरज झोरे, सातारा यांचा समावेश आहे.

महिलांच्या १६ वर्षावरील गटाच्या १० किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांमध्ये साक्षी भंडारी, अहिल्यानगर, मानसी यादव, पुणे, रिनकी पवार, नाशिक, शेवंता पवार, धुळे, आरती भगत, नागपूर, मोनिका सिंग, मुंबई, प्रियांका कुपते, आदिती पाटील, ठाणे, प्रियांका देवरे, नाशिक आणि जयश्री कुंजरा, पालघर यांचा समावेश आहे.

मुलांच्या १८ वर्षाखालील गटाच्या १० किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांमध्ये रोहित संगा, विवेक शाह, ओंकार सावंत, आदित्य यादव, कृष्णा जाधव, आशिष गौतम, अनुप प्रजापती, विघ्नेश पाटील, दुर्वेश पाटील आणि निशू शर्मा यांचा समावेश आहे.

मुलांच्या १५ वर्षाखालील गटाच्या पाच किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांमध्ये आशिष राजबर, रुद्र घाडगे, कयान चव्हाण, ओंकार भट, सर्वेश लावंड, आयान पिंजारी, आर्यन वेखंडे, हर्षवर्धन सुर्वे, रोहीत राठोड आणि प्रतिक खानसोळे यांचा समावेश आहे.

मुलींच्या १५ वर्षाखालील गटाच्या पाच किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांमध्ये अल्येस लोपेझ, अल्विना मॅट्स, श्रेया ओझा, जस्लीन शैजू, भक्ती कदम, बुर्शा शेख, मानसी कांबळे, नेहा हलगरे, वंशिका जंगम आणि प्रिती शहा यांचा समावेश आहे.

मुलांच्या १२ वर्षाखालील गटाच्या तीन किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांमध्ये आराध्य पाटील, रिधम साईल, पवन वर्मा, तेजप्रताप कुमार, जेकब मेयन, दक्ष दळवी, सार्थक यादव, अयन पांडे, मारुती वर्मा आणि अर्णव अडसुळ यांचा समावेश आहे.

मुलींच्या १२ वर्षाखालील गटाच्या तीन किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांमध्ये ओवी पाटील, जान्हवी गुंजाळ, अभिगेल गॅरजल, आहाना निरंकारी, रिया गोसावी, तन्मयी भोईर, स्तुती फातर्फेकर, अद्विका घोळे, अनन्या प्रसाद आणि अनघा भोईर यांचा समावेश आहे.

पुरुषांच्या ६० वर्षांवरील गटाच्या एक किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकांमध्ये नारायण कंदमवार, सुधाकर शिंदे, एकनाथ पाटील, अशोक भोगले आणि पुनाजी सातव यांचा समावेश आहे तर महिलांच्या गटात आशा पाटील, रेखा ताम्हाणेकर, प्राची वाघ, शुभांगी भोगले आणि साधना दलाल यांचा समावेश आहे.

कॉर्पोरेट रनमध्ये एक किमी अंतराच्या स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकांमध्ये दिलीप शिंदे, प्रकाश साईल, स्मिता काजवे, हर्षल पाटील आणि श्रीकांत आंबाडे यांनी क्रमांक पटकावले.

भाजपासह मित्र पक्षांनी फिरवली पाठ

आगामी ठाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असले तरी भाजपला स्वतंत्र निवडणूक लढायची आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कोणत्याही कार्यक्रम किंवा उपक्रमांना येथील स्थानिक पदाधिकारी जाणे टाळत असल्याचे दिसत आहे. यामध्ये वर्षा मॅरेथॉनही अपवाद राहिली नाही. आमदार संजय केळकर बाहेरगावी आहेत. पण आमदार निरंजन डावखरे, भाजपचे शहराध्यक्ष, स्थानिक माजी नगरसेवकही मॅरेथॉनपासून चार हात लांब राहिले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही गैरहजेरी लावली. पण मित्रघटकातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि सत्ताधार्‍यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नजिब मुल्ला यांनीही पाठ फिरवल्याने चर्चा रंगल्या आहेत.