आखाती युद्धाचा फटका ठाणे परिवहन मुख्यालयाला

ठाणे: आखाती युद्धाचे पडसाद आता थेट ठाणे परिवहन सेवेच्या वागळे इस्टेट येथील मुख्यालयातील खानावळीवर उमटले आहेत. गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने ही खानावळ बंद करण्यात आली आहे. परिणामी टीएमटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरु झाले असून कर्मचाऱ्यांना घरून डब्बा आणण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्याचे कळते.

परिवहन इमारतीच्या तळमजल्यावर प्रशस्त खानावळ आहे. यात एकाचवेळी किमान ८०० ते १००० चालक, वाहक तसेच इतर कर्मचारी जेवण व अल्पोपाहार करतात. मात्र गॅस सिलेंडर संपला असल्याने खानावळीला टाळे लावण्याची वेळ आली आहे.

गॅस सिलिंडर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत असून येत्या काही दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत होणे अत्यंत गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून तातडीने पर्यायी व्यवस्था शोधण्याचे काम सुरु झाले आहे.  खानावळीत स्वयंपाक सुरू ठेवण्यासाठी गॅसऐवजी इलेक्ट्रिक शेगड्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.