ठाणे परिवहनला सोसवेना ‘भार’

ठाणे: गेल्या दहा वर्षांत वाढलेली महागाई, कर्मचाऱ्यांची वाढत चाललेली थकीत देणी आणि दुसरीकडे उत्पन्नाचे तोकडे स्रोत यामुळे ठाणे परिवहन सेवा दिवसेंदिवस तोट्यात जाऊ लागली आहे. अखेर तब्बल ११ वर्षांनी प्रवासी भाडेवाढ करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला असल्याचे कळते.

ठाणे परिवहन सेवेच्या तिकीट दरात २०१५ साली किरकोळ वाढ करण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही वाढ झालेली नाही. उलट २०२३ मध्ये एसी बसचे दर ४० ते ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले होते, कारण बेस्टच्या एसी सेवांच्या तुलनेत ठाण्यातील दर जास्त असल्याने प्रवासीसंख्या घटली होती. आता मात्र आर्थिक ताण लक्षात घेता भाडे वाढीशिवाय पर्याय नसल्याचे संकेत मिळत असून, अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परिवहनच्या ताफ्यात सध्या ४०७ बसगाड्या असून त्यापैकी सुमारे ३८० बस रोज प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. दररोज सुमारे २.४५ लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. रोजच्या उत्पन्नाचा आकडा ३० लाखांच्या आसपास पोहोचत असला, तरी विविध सवलतींमुळे ५ ते सहा लाख रुपयांचे संभाव्य उत्पन्न गमवावे लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वार्षिक उत्पन्न साधारण ९० ते ९५ कोटी रुपयांच्या दरम्यान असताना, खर्च मात्र सुमारे ३५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बस परिचालनासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च होतात, तर ई-बस प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद आहे. आस्थापना खर्च १५० कोटी रुपयांच्या घरात असून, उर्वरित खर्चात इंधन, वीज, देखभाल-दुरुस्ती यांचा समावेश आहे. परिणामी, सेवा चालवताना मोठ्या तुटीचा सामना करावा लागत आहे. महागाईचा वाढता प्रभाव, मनुष्यबळावरील खर्च आणि पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेता सध्याच्या दररचनेत सेवा टिकवणे कठीण होत असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. त्यामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मांडण्याची तयारी सुरू आहे. विशेषतः बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या धर्तीवर दररचना निश्चित करण्याची मागणी पुढे येत आहे.