मॉर्निग वॉक आणि मॅरेथॉनसाठी ठाण्याचे रस्ते वाटतात असुरक्षित

ठाणे : काही दिवसांपूर्वी सकाळी फेरफटका मारताना एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता मॅरेथॉन रनर्स आणि सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांना ठाण्याचे रस्ते असुरक्षित वाटत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दक्ष नागरिकांनी ठामपा आयुक्त अभिजित बांगर आणि पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात बड्या गृहसंकुलांची संख्या मोठी असून अनेक गृहसंकुलांमध्येच मॉर्निंग वॉकसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे या नागरिकांना सकाळचा फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावर येण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र अनेक गृहसंकुलांमध्ये ही सुविधा नसल्याने अशा नागरिकांना रस्त्यावरच सकाळचा फेरफटका मारावा लागतो. यामध्ये मॅरेथॉन रनर्स, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळीही सकाळी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात. मात्र आता ठाण्याच्या रस्त्यावर सकाळचा फेरफटका मारायचा कसा असा प्रश्न या सर्व मंडळींना पडला आहे.

सकाळच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून वेगाने वाहने चालवली जातात. आवश्यकता नसताना गाड्यांचे हॉर्न वाजवले जातात. त्यामुळे नागरिकांना विशेषतः स्त्रिया, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून या ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी ठाण्यातील दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.