ठाणे पोलिसांकडून ३९ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

ठाणे : ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि २६ जून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना’चे औचित्य साधत ठाणे पोलीस आयुक्तालयाने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले सुमारे ३९.०३ कोटी रुपये किमतीचे आणि ५९४ किलो ३३२ ग्रॅम (सुमारे ६०० किलो) वजनाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल ११२ गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थ केंद्रीय मुद्देमाल नाश समितीच्या देखरेखीखाली तळोजा एमआयडीसी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये नष्ट करण्यात आले.

नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये ५६४ किलो ६७४ ग्रॅम गांजा (६६ गुन्हे), ६ किलो ७१५ ग्रॅम एमडी (२९ गुन्हे), २० किलो ९८२ ग्रॅम चरस (७ गुन्हे), ८५५ ग्रॅम हायब्रिड गांजा (२ गुन्हे), १०४ ग्रॅम ब्राऊन शुगर (१ गुन्हा) तसेच १,४६७ कफ सिरपच्या बाटल्या (७ गुन्हे) यांचा समावेश होता. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३९ कोटी तीन लाख ४८,४०० रुपये इतकी आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) तथा केंद्रीय मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय-१) मीना मकवाना आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व त्यांच्या पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.