आग विझवण्यासाठी ठाणे पालिकेकडे नाहीत पैसे !

अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदीसाठी शासनाकडून ३५ कोटींच्या अनुदानाची मागणी

ठाणे: स्मार्ट ठाणे अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ठाणे महापालिकेकडे अत्यावश्यक असलेल्या अग्निशमन वाहन खरेदीसाठी देखील निधी शिल्लक नसल्याने या वाहन खरेदीसाठी शासनाकडून तब्बल ३५ कोटी ३५ लाखांच्या अनुदानाची मागणी पालिकेने केली आहे.
अनुदानासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीला हा प्रस्ताव देण्यात येणार आहे.
ठाणे शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाला असून या ठिकाणी अनेक मोठ्या उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. इमारती उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून सर्रासपणे परवानग्या देण्यात येतात. मात्र या उंच इमारतींच्या सुरक्षेविषयी कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही.
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अंतर्गत सध्या नऊ अग्निशमन केंद्र व एक मुख्य अग्निशमन कार्यालय असून दोन नविन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे आहेत. या अग्निशमन केंद्रांमध्ये वाहनांचे १५ प्रकार असून एकुण ६८ वाहने उपलब्ध आहेत. उंच इमारतीमध्ये आग लागल्यास काही वेळा धुर अत्याधिक प्रमाणात झाल्यास अशावेळी ही आग बाहेरुन विझविण्याकरिता अग्निशमन विभागाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अग्निशमन वाहनांची व पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकवस्तीही झपाटयाने वाढत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुध्दा वाढत आहेत. गजबजलेली लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आग विझविताना सुध्दा वेगवेगळ्या प्रकारची तसेच लहान मोठी व अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता आहे. मुख्य रस्त्याच्या आतमध्ये असलेल्या लोकवस्तीमध्ये फायर इंजिन पोहचु शकत नाही, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होज पाईप वापरुन आग विझवावी लागते.
अशा प्रकारच्या आगी विझविण्याकरिता बाजारामध्ये उपलब्ध मल्टी आर्टिकुलेटीग वॉटर टॉवर हे अत्याधुनिक अग्निशमन वाहन फार उपयुक्त ठरते. यामध्ये असलेले चार बुम हे वेगवेगळ्या अँगलमध्ये फिरु शकतात. त्यामुळे उंच इमारतीमध्ये आग लागलेल्या ठिकाणी बाहेरुन पाणी मारुन आग विझविणे शक्य होईल, त्याचबरोबर यामध्ये पुढील भागात असलेल्या कॅमेऱ्यामुळे तेथील सर्व परिस्थितीचा अंदाज आपणांस घेता येऊ शकतो तसेच गजबजलेल्या लोकवस्तीत आग लागल्यास आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होजपाईप टाकण्याची आवश्यकता राहणार नाही. मल्टी आर्टिकुलेटीग वॉटर टॉवर वाहनांमुळे अशा प्रकारची आग लवकरात लवकर विझविण्यास मदत होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे उंच ठिकाणची आग विविण्यासाठी तसेच केमीकल आगीच्या ठिकाणी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात घालण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मल्टी आर्टिकुलेटीग वॉटर टॉवर हे अत्याधुनिक अग्निशमन वाहनाची आवश्यकता भासत आहे.
ठाणे मनपाच्या हद्दीमधून जाणाऱ्या मुंबई-आग्रा हायवे तसेच इतर महत्वाचे रस्ते यावर सुद्धा विविध प्रकारच्या केमिकलची वाहतुक करण्यात येते. या ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडल्यास आग विझविण्याकामी अग्निशमन विभागाकडे पाण्याने आग विझविण्यास मदत करणारी यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
ही सर्व वाहने खरेदी करण्यासाठी ३५ कोटी ३५ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने महापालिका निधीतून खर्च करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. ही वस्तुस्थिती पाहता अग्निशमन दलाची वाहनांबाबत असलेली गरज व महापालिकेची नाजुक आर्थिक स्थिती लक्षात घेता, हा खर्च जिल्हा वार्षिक योजना निधीतून करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक असलेल्या अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदीसाठी देखील ठाणे महापालिकेला आता शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार आहे.
अग्निशमन विभागाकडे आग विझवणेसाठी पाण्याचा प्रभाविपणे वापर करणारे कमीत कमी १० वॉटर टेंडर असणे आवश्यक आहे. यासाठी अग्निशमन विभागाला एक नग मल्टी आर्टिकुलेटींग वॉटर टॉवर (३६ मीटर) व १० नग फायर वॉटर टेंडर १४ टन खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.