दादोजी कोंडदेव स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या 48 व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ विभागाच्या उपांत्य फेरीत ठाणे महानगरपालिकेने चौघुले स्पोर्ट्स क्लबचा 123 धावांनी पराभव केला.
जयदीप परदेशीच्या 69 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांसह केलेल्या 71 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ठाणे महानगरपालिकेने 35 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. त्याचा सलामीचा जोडीदार विकी पाटील (56 चेंडूत 34 धावा) सोबत या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. नंतर सौरभ आंब्रे (27 चेंडूत 35 धावा) आणि शशी कदम (22 चेंडूत 26 धावा) यांनी मधल्या षटकांमध्ये उपयुक्त धावा जोडल्या. चौघुले स्पोर्ट्स क्लबसाठी, ऑफस्पिनर यश पाठक आणि डावखुरा फिरकी गोलंदाज शुभम शेवाळे हे सर्वात यशस्वी गोलंदाज होते. त्यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
प्रत्युत्तरात चौघुले स्पोर्ट्स क्लब 30 षटकांत केवळ 88 धावांत सर्वबाद झाला आणि 123 धावांनी सामना गमावला 10व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ओंकार कापसे याने 41 चेंडूंत पाच चौकारांसह सर्वाधिक 22 धावा केल्या. ठाणे महानगरपालिकेसाठी, डावखुरा फिरकी गोलंदाज कदम हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याने चार बळी घेतले आणि त्याला ऑफ स्पिनर राजेश भुजबळ याची चांगली साथ लाभली ज्याने तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक: ठाणे महानगरपालिका 35 षटकांत सात गडी बाद 211 धावा (जयदीप परदेशी 71; यश पाठक 2/31) विजयी वि. चौघुले स्पोर्ट्स क्लब (ओंकार कापसे 22; शशी कदम 4/16)