ठाणे : श्रीराम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने शहरात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेच्या वतीने ७० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार असून यानिमित्ताने संपूर्ण अयोध्या नगरी सजणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सर्व शहरांमध्ये विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना महापालिकांना दिल्या आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या वतीनेही संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई करण्यात येणार असून यासाठी पालिकेच्या वतीने सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावानुसार ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक उत्सवांसाठी दीड कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात २२ लाख ८२ हजार इतका स्पिल ओव्हर आहे. हा स्पिल ओव्हर वजा केल्यानंतर विद्युत रोषणाईसाठी महापालिकेकडे पुरेशी तरतूद नाही. त्यामुळे या कामासाठी निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात महासभा अस्तित्वात नसल्याने प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.