ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुंबई: मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल तसेच हायस्पीड रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल. हे स्थानक बुलेट ट्रेनसह रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडेल. महारेलने यासंदर्भात एक विस्तृत आरेखनाचे सादरीकरण केले. यामध्ये म्हातार्डी स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच तळोजा मेट्रो यांना कसे जोडता येऊ शकेल याचे संकल्पचित्र होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात हायस्पीड रेल्वे प्रधीकारानास हा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून राबवता कसा येईल हे पाहण्याच्या सूचना दिल्या. हायस्पीड रेल्वे प्राधिकरणाने यावर सकारात्मक भूमिका घेतली असून हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यास मान्यता दिली आहे.

अशा रीतीने हे बुलेट ट्रेन स्थानक जोडले गेल्यास ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच नवी मुंबईतील तळोजा येथील मेट्रो स्थानक येथून प्रवाशांना सहजपणे म्हातार्डी येथे येता येईल.

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा

नवी मुंबई विमानतळ हे मुंबईतील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे. या विमानतळाची प्रवासी क्षमता वर्षाला दोन कोटी असेल. साहजिकच या विमानतळासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतील. सध्या जे मार्ग आहेत ते अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण वरचेवर नवी मुंबई विमानतळावर विमानांची वाहतूक वाढणार आहे. या विमानतळाची राष्ट्रीय महामार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक नेटवर्कशी अखंड जोडणी करणे गरजेचे ठरणार असून यादृष्टीने सध्याचा सी लिंक, बीकेसी ते नवी मुंबई विमानतळ असा बोगदा करता येतो का याची चाचपणी करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी महानगर आयुक्तांना सांगितले आहे. त्यासाठी या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे, एकूणच भू व सागरीय वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त कसा ठरेल ते अभ्यासण्यासाठी तसेच एकूणच आरेखनासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.