वर्षा मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज

* २५ हजारहून अधिक स्पर्धक धावणार
* टाईम टेक्नॉलॉजीचा वापर होणार

ठाणे: ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द् असलेली 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. यंदाही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किमी पुरूष व महिला तसेच 18 वर्षावरील 10 किमीच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा ‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास 25 हजारांहून अधिक धावपटू धावतील असा विश्वास आहे. या स्पर्धेत महापालिका अधिकारी व कर्मचारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्‍या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार ‍ परिषदेत केले.

महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी, मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. रविवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धा विविध 12 गटांत घेण्यात येणार आहे.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी एकूण 13860 इतकी झाली आहे. 12 वर्षाखालील मुले तीन किमी 2378, मुली तीन किमी 2051, 15 वर्षाखालील मुले पाच किमी 4641, मुली पाच किमी 4018, 18 वर्षाखालील मुले 10 ‍ किमी 965, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला एक ‍किमी 22, पुरूष किमी 11 तर कॉर्पोरेट रन एक किमीसाठी 14 जणांची नोंदणी झाली आहे. ऑनलाईन नोंदणी 1850 इतकी झाली आहे. पुरुष 21 ‍किमी खुला गट 610, महिला 21 किमी 190, 18 वर्षावरील पुरूष 10 किमी 730, आणि 16 वर्षावरील महिला 10 किमी 320 इतकी नोंदणी झाली आहे. महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक किमीची ‘कॉर्पोरेट रन’ ठेवण्यात आली असून या स्पर्धेत महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.

· वातावरणनिर्मितीसाठी झुंबाचे आयोजन

यंदाची ठाणे महानगरपालिका ही सहा वर्षांनी होत आहे, स्पर्धेच्या दिवशी वातावरणनिर्मिती व स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सरावासाठी झुंबा वर्कआऊटचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेजसमोर झुंबा वर्कआऊट होणार आहे.

रेल्वे आणि परिवहन बसेसची सोय

या स्पर्धेत ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. स्पर्धकांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेत पोहचता यावे यासाठी रविवार 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5 वाजता बदलापूर ते ठाणे व दुपारी 1 वाजता ठाणे ते बदलापूर अशी “विशेष लोकल सेवा” उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

विजेत्यांना १० लाखांची बक्षिसे

यंदा मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली असून 21 कि.मी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 1 लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्वच बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पहिल्या तीन गटातील स्पर्धा राज्यस्तरीय असून, 21 कि.मी गटातील पुरूष व महिला विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक एक लाख, दुसरे 75 हजार, तिसरे 50 हजार, चौथे 30 हजार अशी बक्षिसे आहेत. त्या शिवाय 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक व चषके ठेवण्यात आली आहेत.

10 कि.मी 18 वर्षावरील खुल्या गटातील स्पर्धा खारीगांव ते कोपरी मार्गे महापालिका भवन अशी असून स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार, दुसरे 20 हजार, तिसरे 15 हजार, चौथे 10 हजार व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक व चषके ठेवण्यात आली आहेत.

10 कि.मी 18 वर्षाखालील मुलांसाठी असलेली स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून मिलेनियम टोयाटा येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार, दुसरे 20 हजार, तिसरे 15 हजार, चौथे 10, हजार, व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक व चषके ठेवण्यात आली आहेत.

10 कि.मी 15 वर्षावरील मुलींसाठी (खुला गट) असलेली स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार दुसरे 20 हजार, तिसरे 15 हजार, चौथे 10 हजार व 5 ते 10 पर्यंतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख बक्षीसे व चषके ठेवण्यात आली आहेत.

15 वर्षाखालील मुले व मुली दोन गटासाठी पाच किमी अंतराची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून ही स्पर्धा माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक आठ हजार, दुसरे सहा हजार, तिसरे 5,500, चौथे पाच हजार व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिक व चषके ठेवण्यात आली आहेत.

12 वर्षाखालील मुले व मुली दोन गटासाठी तीन कि.मी अंतराची स्पर्धा असून या दोन्हीही गटांसाठी पहिल्या ते चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे पहिले पारितोषिक 5,500, दुसरे पाच हजार, तिसरे 4,500/, चौथे 3,500, व 5 ते 10 पर्यतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक रोख पारितोषिके व चषक ठेवण्यात आले आहेत. या गटातील स्पर्धा महापालिका भवन, पाचपाखाडी येथे सुरू होऊन परत महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक पुरूष व महिला या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली असल्याचे नमूद करीत या पत्रकार परिषदेत मॅरेथॉन स्पर्धेच्या टिझरचे तसेच मॅरेथॉन गाण्याचे व स्पर्धकांना देण्यात येणारे टी शर्ट, खाऊ तसेच विविध वयोगटासाठी विविध रंगात देण्यात येणाऱ्या चेस्ट नंबरचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.