ठाणे जिल्ह्याच्या वाट्याला येणार पुन्हा केंद्रीय मंत्रिपद?

विशेष प्रतिनिधी/ठाणे

राजधानी दिल्लीत नव्या सरकारच्या स्थापनेची लगबग सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘हॅटट्रिक’ साधण्यात यशस्वी झाले तर कल्याणचे हॅटट्रिक साधणारे महायुतीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.

ठाणे जिल्ह्याला कपिल पाटील यांच्या रूपाने केंद्रातील राज्यमंत्रीपद मिळाले होते. भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (महा आघाडी) सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला. कुणबी मतदारांनी नीलेश सांबरे यांच्या पारड्यात दोन लाखांपेक्षा अधिक मते टाकल्याचा फटका पाटील यांना बसला. आणि ते ६६ हजार मतांनी पराभूत झाले.

मुंबईतही सहापैकी चार जागा महाआघाडीने पटकावल्या आहेत. दोन जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले. त्यापैकी उत्तर मुंबई मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियूष गोयल विजयी झाले.

ठाणे-मुंबईत महायुतीला केंद्रीय मंत्रिमंडळात श्री.गोयल यांच्याबरोबर कोणाला घेतले गेले तर डॉ.श्रीकांत शिंदे यांचा क्रमांक लागू शकतो.

डॉ.शिंदे हे कल्याणचे खासदार असले तरी त्यांचे वास्तव्य ठाण्यात असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरात अजून एक लाल दिव्याची गाडी येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.