ठाणे शहर शाखाप्रमुख उद्धव जगताप यांचे निधन

ठाणे: ठाण्याचे शहर शाखाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे विश्वासू सहकारी उद्धव जगताप यांचे बुधवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ९७ वर्षांचे होते.

श्री.जगताप हे पूर्वी भांडुप शाखाप्रमुख होते. मात्र ठाण्यात नोकरीला असल्याने ते ठाण्यात स्थायिक झाले. त्यानंतर ते ठाणे शहर शाखाप्रमुख झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासोबत ते सावलीसारखे राहिले. ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. वयाच्या ९५ व्या वर्षांपर्यंत ते आनंदाश्रमात उपस्थिती लावत होते. त्यांच्याबद्दल शिवसैनिकांना आदर होता.

सध्या ते उन्नती वूड्स, आनंदनगर, घोडबंदर येथे राहत होते. दर तीन वर्षांनी २८ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस आनंदाश्रमात साजरा करण्यात येत असे. मात्र तीन दिवस आधीच २५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे राहत्या घरी निधन झाले.

मृत्युसमयी ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शेकडो लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या जाण्याने शिवसेना वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.