प्रकल्प पूर्णत्वास येण्यास उजाडणार २०२८ साल?
ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणारा भुयारी मार्ग पूर्ण होऊन ठाणे-बोरिवली रस्ता प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यास २०२८ साल उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाण्याहून बोरिवली आणि बोरिवली येथून ठाण्यात अवघ्या २० मिनिटांत पोहचण्यासाठी टिकूजीनी वाडी येथून जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. एमएमआरडीएचा हा १६ हजार कोटी रुपये खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. एमएमआरडीएने पर्यावरण आणि वन विभागाचे या भुयारी मार्गाकरिता ना हरकत प्रमाणपत्र मिळवले असून या भुयारी मार्गाचे काम लार्सन अँड टूब्रो या कंपनीला दिले जाणार आहे. लवकरच या मार्गाचे काम सुरु होणार आहे. या मार्गाचे काम २०२८ साली पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मानपाडा ते टिकूजीनी वाडी हा रस्ता सद्या ४० मिटर रुंद आहे. हा रस्ता भुयारी मार्गाच्या मुखाशी ६० मिटर इतका केला जाणार आहे. या मार्गांवर तीन खासगी आणि एक म्हाडाचा भूखंड येत आहे. खाजगी विकासकाने त्या भूखंडावर इमारतीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे तसेच म्हाडाकडून देखिल इमारती बांधणी केली जाणार आहे. या संस्थांना त्यांच्या आराखड्यात बदल करण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या होत्या. त्यांनी त्यास मान्यता देखिल दिली आहे. असे एका अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले. हा रस्ता पुढे ४५ मिटर आणि घोडबंदर वळणावर ४८ मिटर इतका केला जाणार असल्याचे देखिल त्या अधिकाऱ्याने सांगितले.
हा भुयारी मार्ग झाल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत बोरिवली येथे पोहचणे शक्य होणार आहे. घोडबंदर मार्गांवरून बोरिवली येथे जाताना होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका होणार आहे. मात्र त्यासाठी २०२८ सालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.