दीप रांभिया आणि सोनाली मिलखेलकर यांना सुवर्णपदक!

अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम

सूरज पी. एच. यांना आंतरराष्ट्रीय रौप्यपदक

ठाणे: अबुधाबी येथे ६ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ४८व्या आय.एस.सी अपेक्स यूएइ ओपन बॅडमिंटन एलिट चॅम्पिअनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला.

आयकर विभाग, मुंबई येथे कार्यरत असलेले आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे सूरज पी. एच. यांनी पुरुष दुहेरी 35 वर्षांवरील गटात मोहम्मद रेहान यांच्यासह भारतासाठी रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्यांना माजी जागतिक क्रमांक ९ तसेच विद्यमान 35 वर्षांवरील पुरुष दुहेरी विश्वविजेते डॅनी बावा क्रिस्टनंता (सिंगापूर) आणि फर्नांडो कुर्नियावन (इंडोनेशिया) या जोडीविरुद्ध ११-१५, ९-१५ असा पराभव पत्करावा लागला; मात्र त्यांच्या लढाऊ आणि शिस्तबद्ध खेळामुळे भारताला अभिमानास्पद दुसरे स्थान मिळाले.

या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण सहा आंतरराष्ट्रीय पदके जिंकत ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपक्रमाची ताकद सिद्ध केली. पुरुष दुहेरी गटात दीप रांभिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या सरवनन कन्नन व अभीश वल्लाचीरा यांचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत देव अय्यप्पन व धिरेन अय्यप्पन (यूएई) यांना २१-१३, २१-१९ असे नमवत अंतिम फेरी गाठली; मात्र अंतिम सामन्यात भारताच्या हरिहरन व ध्रुव रावत यांच्याकडून २१-११, २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदक पटकावले.

मिश्र दुहेरी प्रकारात दीप रांभिया व सोनाली मिखेलकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या धिरेन अय्यप्पन व अलीना काथून यांचा १२-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव करत शानदार पुनरागमन केले. उपांत्य फेरीत हरिहरन व ताबिया खान यांना २१-१८, २१-१५ असे नमवले. अंतिम सामन्यात यूएईच्या अँडी मारवान हम्झा व नुरानी रुतु अझ्झाह्रा या जोडीवर १८-२१, २१-१६, २१-१२ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरी प्रकारात सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली.

एकूणच दीप रांभिया व सोनाली मिखेलकर सुवर्णपदक (मिश्र दुहेरी), दीप रांभिया यांनी रौप्यपदक (पुरुष दुहेरी), सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर यांनी कांस्यपदक (महिला दुहेरी) आणि सूरज पी. एच. यांनी रौप्यपदक (पुरुष दुहेरी 35+) अशी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण सहा आंतरराष्ट्रीय पदके ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खात्यात जमा झाली.

या सर्व यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची भक्कम प्रशिक्षण व्यवस्था, प्रमुख प्रशिक्षक श्रीकांत वाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.