ठाणे आणि कल्याण भाजपचेच

ठाण्यातील मेळाव्यात आमदार संजय केळकर यांचा प्रतिहल्ला

ठाणे: ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा आमदार संजय केळकर यांनी करताच मेळाव्याला उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी या आधी या दोन मतदारसंघांवर दावा केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून आलेल्या या प्रतिक्रियेने आगामी जागा वाटपाचा मार्ग खडतर असणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मोदी सरकारने नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजना आणि धोरणांची माहिती देण्यासाठी भाजपने आज, रविवारी ठाणे लोकसभा मतदारसंघात मेळावा आयोजत केला होता या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबरच बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे, कल्याण आणि पालघर हे मतदारसंघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील, असा दावा आमदार संजय केळकर यांनी मेळाव्यात बोलताना केला. त्यावर उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नावानेच मित्रपक्षातील उमेदवार निवडून दिल्लीला गेले आणि आता ही जागा आमची, ती जागा आमची असे दावे करत आहेत. त्यांची कीव येते. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असा आव काही जण आणत आहेत. अशा फुकटच्या वल्गना करण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या योजना तर राबवा, असा टोला श्री.केळकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना नाव न घेता लगावला. भारतीय जनता पक्षाशिवाय या जिल्ह्यांमध्ये कोणीही निवडून जाऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. त्यांची बरोबरी करणारा एकही नेता देशात नाही. त्यांनी गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या, त्यांचे जगणे सुकर करण्यासाठी अनेक धोरणांची अमलबजावणी केली. त्यामुळे अब की बार पुन्हा मोदी सरकार अशा घोषणा जनताच देईल, असा विश्वासही श्री. केळकर यांनी व्यक्त केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघ काही कठीण नाही, या ठिकाणी संघटनात्मक प्रचंड ताकद असून इथे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना दाखवून द्यायचे आहे की, ठाणे जिल्हा हा पूर्वीपासून ते आतापर्यंत भाजपचाच आहे, असे सांगत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याची आठवण करून दिली.

आपली अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये भाजपचा कार्यकर्ता कमजोर होता कामा नये. त्यांनी आपली जिद्द सोडता कामा नये. त्यांनी आपली लढाई ही बुथवर लढली पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये पक्षाबद्दल प्रचंड अभिमान असला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचा इतिहास सांगत आतापर्यंत या येथे भाजपचेच वर्चस्व होते आणि आहे, असे सांगितले. मग हे मतदारसंघ कोणाचे, असा प्रश्न त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला असता सभागृहात साऱ्यांनीच हात वर करून हे मतदारसंघ भाजपचेच, अशी एकमुखी प्रतिक्रिया दिली.