ठाणे: पालिका निवडणुकीनंतर प्रशासनाने वसुलीवर भर दिला असून मालमत्ता करापोटी आतापर्यंत तब्बल ६०४ कोटी ७७ लाख जमा झाले आहेत.मागील वर्षी याच काळात ५१८ कोटींची वसुली झाली होती.
मालमत्ता कर विभागाला २०२५-२६ वर्षांकरिता ९०० कोटींचे लक्ष्य दिले आहे. विभागाने आतापर्यंत ६०४. ७७ कोटींची वसुली केली आहे. प्रशासनाने ठेवलेल्या उद्दीष्टाच्या ८० टक्के इतकी वसुली झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५१८. ७५ कोटींची वसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५६. ८३ कोटींची अधिकची वसुली आतापर्यंत झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीअंतर्गत मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम जोरदार सुरु झाली आहे. त्यानुसार थकबाकीदारांना नोटीस बजावणे, त्यानंतर मालमत्ता सील करणे, जप्तीची कारवाई करणे अशी मोहीम राबविण्यात येते आहे.
मालमत्ता कर वसुलीत ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने १८३ कोटी २६ लाखांची सर्वात जास्त वसुली करण्यात आली आहे. तर सर्वात कमी वसुली ही कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत म्हणजेच १९ कोटी ४१ लाख झाली आहे. तर वर्तकनगर आणि नौपाडा प्रभाग समितीने वसुलीत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.
५९ टक्के मालमत्ता धारकांनी ऑनलाईन भरणा करुन या पर्यायाला पसंती दर्शवली आहे. www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरुन Payment Gateway द्वारे ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप द्वारे देखील करदात्यांना मालमत्ता कर सुलभतेने जमा करण्याची सुविधा आहे. तरी नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.