* हप्ते वसुलीवरून हाणामाऱ्या
* प्रशासन मूग गिळून गप्प
ठाणे: शहरातील मुख्य रस्त्यावर हातगाडी लावून हप्ता वसुली करण्यावरून टोळी युद्ध भडकण्याची शक्यता असून ठाणे महापालिका मुख्यालयाला फेरीवाल्यांनी घातलेला विळखा ठाणेकरांचा चर्चेचा विषय ठरला आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी आणि टपऱ्यांनी चांगलेच बस्तान बसवले आहे. येथे पद पथावर मासेविक्री, वडापाव, सरबत विक्री असे व्यवसाय करणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे रस्ते अडवत आहेत. त्याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना होत आहे. आईमाता मंदिर परिसरातही फेरीवाल्यांनी पदपथांवर बस्तान मांडले आहे.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अनेक अधिकारी मुख्यालयासमोरील रस्त्यावरून ये-जा करीत असतात. या भागातील फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या भागातील गुंड रस्त्यावर हातगाडी लावण्यासाठी फेरीवाल्याकडून शंभर ते आठशे रुपये दरदिवशी वसुल करत असतात त्यावरून १०ते १५ दिवसांपूर्वी दोन गटात वाद निर्माण झाला होता. हातगाडी पलटी करण्यात आल्याने वातावरण तंग झाले होते. या भागात हातगाडी लावण्याच्या वादातून एखाद्याची हत्या होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
महापालिका मुख्यालय फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत महापालिका प्रशासन दाखवत नसल्याने ठाणेकर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केला असला तरी मुख्य बाजारपेठ, नौपाडा-गोखले रोड, गावदेवी, कळवा स्टेशन रोड परिसर खारीगाव, वर्तकनगर, किसन नगर येथिल मुख्य बाजारपेठ, श्रीनगर, वर्तकनगर नाका, बाळकूम नाका, मानपाडा, घोडबंदर परिसर, दिवा स्टेशन रोड, मुंब्रा स्टेशन, कौसा गुलाब मार्केट आदी भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवावाल्यांनी बस्तान बसवले आहे. या फेरीवाल्यांकडून स्थानिक गुंड आणि काही पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर हप्ता वसुल करत असल्याचे अनेक फेरीवाल्यानी सांगितले आहे. या गुंड आणि स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याने फेरीवाले रस्त्यावर गाड्या उभ्या करतात. त्याचा त्रास ठाणेकरांना होतो. महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी फेरीवाला धोरणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून बेकायदेशीरपणे रस्ता आणि पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी ठाणेकर करत आहेत.