ठामपावर शिवसेना-मनसेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार
ठाणे : विजय मेळाव्यात २० वर्षांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बंधू एकत्र आल्याने राज्यात दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाण्यात तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे या दोन पक्षांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची साथ मिळणार असून आगामी काळात ठाण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळू शकेल, असे मनसेच्या एका नेत्याने सांगितले.
हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने पुकारलेल्या लढ्याला यश मिळाले. राज्य सरकारने या संदर्भातील निर्णय मागे घेतल्याने दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मुंबईतील वरळी डोम येथे विजय मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर ठाकरे बंधू २० वर्षांनी प्रथमच एकत्र दिसले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हे वातावरण ठाण्यातही पाहायला मिळत असून आगामी महापालिका निवडणुकीत याचा लाभ दोन्ही पक्षांना कसा मिळेल याबाबत चाचपणी केली. यावेळी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत जोश आणि उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील साथ मिळणार असल्याची बातमी असून आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना विजय मिळवताना घाम फुटू शकतो, असे बोलले जात आहे.
याबाबत मनसेचे जिल्हाप्रमुख आणि नेते अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तीन पक्ष एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना पळत भुई थोडी करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येण्याने राज्यात उत्साहाचे वातावरण तयार झाले असून जाती-भेदाच्या पलीकडे जाऊन मराठी माणूस एकत्र आल्याचे दिसत आहे. ठाण्यात मागील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि माझ्या मतांची बेरीज केली तर एक लाखावर मते झाली होती. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढलो तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला पळता भुई थोडी होईल. सध्या या दोन पक्षांची प्रतिमा सर्वसामान्य ठाणेकरांमध्ये मलिन झालेली आहे. शिवाय त्यांच्यात ठाण्यात अनेक भागात अंतर्गत भांडणे आहेत. या पार्श्वभूमीवर संघर्षातून वर आलेले मी, राजन राजन विचारे आणि आमदार जितेंद्र अव्हाड असे आम्ही तिघे ठाण्यात एकत्र कार्यक्रमांच्या माध्यमातून शहर ढवळून काढणार आहोत. हा काळ हिंदुत्वाच्या मुद्द्याचा नसून राहिला मराठी माणूस, आणि स्थानिक समस्या केंद्रीभूत मानण्याचे दिवस आहेत. त्यावरच आम्ही काम करत असून येत्या काळात मनसे ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी मिळून मोठा धमाका करणार असल्याचा इरादा श्री.जाधव यांनी स्पष्ट केला.
ठाकरे बंधू एकत्र आले असून महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना नख लावण्याचे प्रयत्न आता होणार नाहीत असा इशारा कालच्या विजयाच्या सभेत दोघांनी दिला आहे. त्यामुळे आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे हे ठाणे आहे, ठाण्याची जनता देखील सुज्ञ आहे. येणाऱ्या काळात शिवसैनिक आणि मनसैनिक एकदिलाने एकत्रितपणे ठाणे जिल्ह्यात काम करताना दिसेल, असा विश्वास शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला.
दोन्ही भाऊ एकत्र आल्याने ठाणेच नव्हे तर संपूर्ण राज्यात चित्र बदलणार आहे. ठाण्यात देखील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते खुश आहेत, त्यांच्यात एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. दोन्हीकडील कार्यकर्ते एकत्र येऊन ठाण्यात एक नवा इतिहास रचतील, असा विश्वास मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यात जनतेला न्याय मिळण्याबाबत विश्वास निर्माण झाला आहे. ठाण्यात दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण आहे. शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असताना विधानसभा निवडणुकीत कोपरी-पाचपाखाडीमध्ये मला २२ हजार मते मिळाली होती, महापालिका निवडणूक एकत्र लढवली तर मराठी माणूस एकत्रित होऊन मतदान करेल, आणि शिवसेना-मनसे इतिहास रचेल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे. कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर झाली आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे ठाण्यात मराठी मतांमध्ये होणारी फूट टळली आहे. शिवसेना व मनसे पक्षांत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या नि:स्वार्थ व निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. ठाण्यांतील नागरीक सत्ताधाऱ्यांच्या, तसेच ठाणे महापालिकेच्या कारभाराला गेल्या दोन-तीन वर्षांत प्रचंड कंटाळलेले आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने ठाण्यात आशादायी आणि दिलासादायक वातावरण असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा-माजीवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मणेरा यांनी दिली.
महाराष्ट्रात मराठी भाषेचा अनादर करणे तसेच मराठी माणसांना घरे नाकारणे, अपमानास्पद वागणूक देणे, मारहाण करणे अशा घटना गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत. मराठी माणसाने ठाकरे कुटुंबावर नेहमीच प्रेम केले आहे. आता दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रेम द्विगुणीत झाले आहे तसेच मराठीसाठीच्या लढ्याला बळ देखील मिळाले आहे. मराठी भाषेच्या लढ्यात दोन्ही बंधू एकत्र आले, याचा अर्थ निवडणुकीत एकत्र येतीलच असे काही नाही, परंतु जर एकत्र आलेच तर सत्ताधारी घरी बसतील. ठाण्यात मराठी टक्का जास्त आहे. जशी शिवसेनेची पहिली सत्ता ठाण्यात आली होती, त्या जोडीला मनसे सुद्धा भागीदार होऊन त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असा विश्वास मनविसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.