निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि बोधचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या हवाली केले आणि त्यामुळे खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना असा वाद निर्माण झाला. उभयपक्षी त्याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरु असून अंतिम निर्णय आगामी निवडणुकीत आता मतदारच देतील हे श्री. शिंदे आणि श्री. उध्दव ठाकरे यांच्या एव्हाना लक्षात आले असणार. अजित पवार यांच्या सरकारमधील नाट्यमय (अनपेक्षित म्हणणे भाबडेपणाचे ठरेल ) प्रवेशानंतर शिंदे आणि ठाकरे यांनी तातडीने राज्याचे दौरे हाती घेतले असून खरे-खोटेपणाचा योग्य फैसला करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. गद्दार, खोके वगैरे आरोपांपलिकडे नवे ‘नॅरेटिव्ह’ घेऊन जावे लागेल कारण जनतेला राजकारणाची झालेली सर्कस आता पहावेनाशी झाली आहे. ना जोकरचे चाळे पाहून बसू येत आहे की झोक्यांवरील कसरती पाहून ह्रदयाचे ठोके चुकत आहेत. जनतेच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना भूमिका मांडावी लागणार आहे. दोघांनाही राजकीयदृष्ट्या पाया भक्कम करावा लागणार असून नैतिकअनैतिक हा सांप्रत काळातील गैरलागू मुद्यावर बोलण्यात वेळ दवडणे टाळलेले बरे. या प्रयासात चालढकल झाली तर गाठ भाजपाशी आहे हे त्यांनी विसरता कामा नये! अजित पवारांचा उपयोग या दोन्ही सेनांना शह देण्यासाठी नसेलच असे नाही.त्यामुळे पूर्वी ज्याला बेरजेचे राजकारण म्हटले जायचे आणि त्यालाच आता कूटनितीचे लेबल लावून ते बाजारात आले असेल तर मुत्सद्दीपणापेक्षा भावनांवर बेतलेले राजकारण करणाऱ्या ठाकरे आणि शिंदे यांना आव्हानात्मक ठरू शकेल. राजकारणाच्या सध्याच्या वेगाचे तर विचारूच नका. एफ १ स्पर्धेतील स्पर्धकांना फडणवीस लाजवतील असा त्यांचा वेग आहे. अशा स्पर्धांवर प्रभुत्व असणारे शरद पवारही चक्रावून गेले नसतील तर नाही!अशा काळात दोन्ही सेनांना आपले सध्याचे राजकीय अभिनिवेश आणि एकमेकांविरुध्द दंड थोपटण्याची भाषा सर्वप्रथम बंद करावी लागेल.
ज्या ठाकरी भाषेमुळे शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेला एकेकाळी भुरळ घातली होती, तिचा परिणाम आजच्या समाजमनावर होणार नाही. त्यामुळे बाळासाहेबांची भाषा आजच्या जमान्यात कोणालाच परवडणारी नाही. त्या परखडपणाचे गमक बाळासाहेबांनी सत्ताकारणापासून स्वत:ला विलग ठेवले होते हे लक्षात घ्यावे लागेल. उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेच्या फळाची थेट चव चाखली आहे, त्यामुळे त्यांना हातात रिमोटऐवजी फळ कापण्याची सुरीच घ्यावी लागणार! किंगमेकर ही संकल्पांना रद्दबातल झाली आहे.सत्तेच्या फळाची हा दुष्परिणाम बाळासाहेबांनी ओळखली होती. अर्थात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून उध्दव वा शिंदे यांना त्यापासून दूरही रहाता आलेले नाही. सत्ता चाखल्यावर विरोधी पक्ष म्हणून घेतली जाणारी आक्रमक भूमिका कायमच बोथट रहाण्याची भीती असते आणि त्यामुळे जनतेशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर निघालेल्या या दोन्ही नेत्यांना जनता उलटे जाब विचारु शकते. बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत असे आव्हान कोणी देत नसे.
आडनावाचा फायदा उदध्व यांना स्वाभाविकपणे मिळत रहाणार. या आघाडीवर शिंदे यांना विशेष परिश्रम करावे लागणार. तसे ते करीतही आहेत. परंतु मुख्यमंत्रीपद आणि पक्षप्रमुख पद अशी दोन पदे सांभाळताना त्यांना तारेवरची कसरतही करावी लागणार आहे. भाजपाबरोबर सध्या त्यांची युती असली तरी ती अजित पवारांच्या प्रवेशामुळे कमजोर झाली आहे. अशा वेळी भाजपाला भले मित्र वगैरे असला तरी खरी ताकद दाखवण्यासाठी या दौऱ्यांचा उपयोग करावा लागेल. सरकार म्हणून आपण काय करीत आहोत आणि भविष्यात काय करणार हे जितक्या हिरीरीने श्री. शिंदे बोलत आहेत त्याच आसक्तीने पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांना बोलावे लागणार आहे. सरकार आणि संघटना अशा दोन स्थरांवर त्यांच्या संवादाचा रोख असायला हवा. भिवंडीच्या मेळाव्यात श्री. देवेंद्र फडणविस यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनातील शंकांचे काहुर दूर केले तसेच काहीसे श्री. शिंदे यांना आगामी काळात बोलत रहावे लागणार आहे. उध्दव हे शिवसेनेच्या ‘कमिटेड’ मतदारांच्या सहानुभूतीचे धनी झाल्याचे बोलले जात असते. ही सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीने श्री. शिंदे यांची आवाहने असावी लागणार आहे.
श्री.शिंदे यांचा ‘मास अपील’त्यांना आगामी काळात राजकीय प्रतिकारशक्ती मिळवून देणार आहे. ठाकरे आडनाव नसण्याची अडचण त्यांना आपली भूमिका कशी समर्थनीय होती आणि आगामी काळात ती परिणामकारक करण्यावर भर द्यावा लागणार आहे. सत्तेत आल्यावर टीका ही होतच रहाणार. परंतु त्याकडे जास्त लक्ष दिले तर ‘ट्रॅप’ मध्ये अडकत जाऊ हे एव्हाना श्री. शिंदे यांना समजले असेल. भाजपावर विसंबून रहाताना राष्ट्रवादीच्…