टेनिस क्रिकेटला मिळणार राष्ट्रीय ओळख

आयटीसीएसएफच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खा. श्रीकांत शिंदे

ठाणे: आयटीसीएसएफ या टेनिस क्रिकेटच्या देशव्यापी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. ठाण्यात झालेल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

निवडीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना खासदार डॉ. शिंदे यांनी “टेनिस क्रिकेट हा केवळ छंद न राहता, खेळाडूंना करिअरच्या संधी देणारा खेळ व्हावा, हीच या फेडरेशनमागची भूमिका असून या खेळाला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ठाणे येथे पार पडली. या सभेत डॉ. शिंदे यांची फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अधिकृत निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय पातळीवर शिस्तबद्ध आणि अधिकृत व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आहे. या सभेला देशभरातील फेडरेशनचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी, स्पर्धा आयोजक, संघ मालक, माजी खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपले मनोगत मांडताना म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघासह राज्यातील आणि देशातील विविध जिल्ह्यांमध्ये टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जाते. सातत्याने होणाऱ्या स्पर्धा आणि मोठ्या प्रमाणावर सहभागी होणारे तरुण पाहता, या खेळाला अधिक संघटित, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक दिशा देण्याची गरज होती. त्या पार्श्वभूमीवर आयटीसीएसएफच्या माध्यमातून एक सकारात्मक आणि आशादायी सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या फेडरेशनद्वारे टेनिस क्रिकेट खेळाडूंना विश्वासार्ह व्यासपीठ मिळणार असून, योग्य मार्गदर्शन, संधी आणि संघटनात्मक रचना उभी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. भविष्यात देशभरातून अनेक नवे, गुणवान खेळाडू घडतील, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमास टेनिस क्रिकेट फेडरेशनचे विविध राज्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.