टेम्पो चालकाच्या मुलाची विजय मर्चंट ट्रॉफीसाठी निवड

बदलापूर : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील संघात विजय मर्चंट ट्रॉफीसाठी बदलापूरच्या हिमांशू सिंगची निवड झाली आहे. हिमांशू हा बदलापूरच्या पीएएसएफ क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू असून तो १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळणार आहे.

हिमांशू गोलंदाज असून नुकत्याच झालेल्या कल्पेश कोळी सिलेक्शन टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ केल्याने त्याची निवड करण्यात आली. यापूर्वी हॅरिस शिल्ड स्पर्धेत त्याने चेंबूरच्या जनरल एज्युकेशन शाळेच्या वतीने खेळत चमकदार कामगिरी केली होती.

भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शामी याच्या गोलंदाजीचा हिंमाशूवर प्रभाव आहे. हिंमाशूचे वडील टेंपो चालक असून त्याच्या कुटुंबाची स्थिती बेताची आहे. त्यामुळे मुंबईतील लहान मुलांच्या क्रिकेटमध्ये खेळणे त्याच्यासाठी अवघड होते. मात्र, पीएएसएफ क्रिकेट अकॅडमीने त्याच्या क्रिकेट किट, फिटनेस अभ्यासक्रम, शाळा प्रवेश, वैयक्तिक प्रशिक्षण यांसारख्या गोष्टींची काळजी घेतली, अशी माहिती अकॅडमीचे मेंटर आणि रणजी, आयपीएलचे खेळाडू राहिलेले क्रिकेटपटू रोहन राजे यांनी दिली आहे. राजे यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात खेळले आहेत. किरण रामायणे हे हिंमाशूचे मुख्य प्रशिक्षक आहेत. हिमांशूच्या या निवडीमुळे त्याचे कौतुक होत असून यातून बदलापुरसारख्या शहरातून क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची आशा बाळगणाऱ्या खेळाडूंना नवी प्रेरणा मिळणार आहे.