भाजपने जिल्ह्यात वाटल्या निवडणुकीच्या जबाबदाऱ्या
ठाणे: आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक उमेदवार निवडून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदार संघप्रमुख नियुक्त केले असून ठाणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी माजी खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर विधानसभा क्षेत्र प्रमुखांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी शशिकांत कांबळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४८ मतदारसंघ आणि विधानसभेच्या २८८ मतदार संघातील प्रमुखांच्या नावाची घोषणा केली. सहा विधानसभा मतदार संघ मिळून ठाणे लोकसभा मतदार संघ होतो. या मतदार संघाच्या प्रमुखपदी माजी खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदार संघातील ठाणे विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माजी नगरसेवक ॲड. सुभाष काळे यांच्याकडे देण्यात आली आहे. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघाच्या प्रमुखपदी आ.ॲड. निरंजन डावखरे, माजिवडे-मानपाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुखपद माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांना देण्यात आले आहे.
ऐरोली मतदार संघाची जबाबदारी माजी आमदार संदीप नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मीरा-भाईंदर मतदारसंघाची जबाबदारी रवी व्यास तर बेलापूर मतदारसंघ प्रमुखपदी निलेश म्हात्रे यांना नियुक्त करण्यात आले आहे.
विधानसभा मतदार संघाची जबादारी देण्यात आलेल्या प्रमुखांनी विधानसभा क्षेत्रात पक्ष वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. बूथनिहाय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे, पक्षाने घेतलेले निर्णय मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ मतदारसंघ जिंकण्यासाठी आत्तापासूनच भाजपने कंबर कसली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखपदी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मधुकर मोहपे तर पालघर लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखपदी नंदकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघ, कळवा-मुंब्रा, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या सहा मतदार संघाने बनला असून या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी अनुक्रमे माजी खासदार संजीव नाईक, नंदू परब, संजय मोरे, प्रज्ञेश प्रभुघाटे, जमनादास पुरस्वामी आणि गुलाबराव करंजुले यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.
विधानसभा क्षेत्राच्याजबाबदाऱ्या भाजप-शिंदे गटाच्या पथ्यावर
राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची यांची युती असून आगामी विधानसभा निवडणुका या युतीच्या माध्यमातूनच लढवण्यात येणार आहेत. त्यानुसारच भाजपाने ठाणे जिल्ह्यासह राज्यात विधानसभा क्षेत्र प्रमुखांची नियुक्ती केली असल्याची चर्चा आहे.