तामिळनाडूची फिरकी आणि “बाबा” गिरी पडली मध्यप्रदेशवर भारी

दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे खेळले गेलेल्या कमी धावसंख्येच्या चकमकीत, तामिळनाडूने रविवारी त्यांच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात मध्य प्रदेशवर 17 धावांनी विजय मिळवला.

दोन दिवसांपूर्वी 383 धावा करणाऱ्या खेळपट्टीला लागून असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना, तामिळनाडूला 49.5 षटकांत 195 धावांवर बाद केले गेले. बाबा इंद्रजित या लढतीतील एकमेव योद्धा होता. त्याने 115 चेंडूत मास्टरक्लास शानदार 92 धावा केल्या. मध्य प्रदेशचे गोलंदाज किफायतशीर गोलंदाजी करत होते ज्यामुळे तामिळनाडूच्या फलंदाजांना मोकळेपणाने धावा करता नाही आल्या. राहुल बाथम, सरांश जैन आणि शुभम शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने शेवटच्या सामन्यात त्याच मैदानावर 61 धावांत गुंडाळल्यानंतर या वेळी सावधपणे धावांचा पाठलाग सुरू केला. मात्र त्यांनी अवघ्या 27 धावांत चार विकेट गमावल्या. रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर (56 चेंडूत 27 धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली नसती तर मध्य प्रदेशला आणखी एक मोठा फटका या मैदानावर बसला असता. पाटीदारने 103 चेंडूत 73 धावा केल्या होत्या. फिरकीपटू साई किशोर आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी केली. प्रचंड आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला तामिळनाडूचा कर्णधार दिनेश कार्तिकने गोलंदाजीत लक्षणीय बदल आणि उत्तम फील्ड प्लेसमेंट केल्या. त्याच्या गोलंदाजांनी तयार केलेल्या प्रत्येक संभाव्य संधीसाठी कार्तिक जणू काही त्याचे जीवन त्यावर अवलंबून असल्यासारखे अपील करत होता. ते दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते.

सुलक्षण कुलकर्णी

 

 

 

 

 

 

 

 

सामना संपल्यानंतर तामिळनाडूचे आनंदी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी, जो एक ठाणेकर आहे, यांनी ठाणेवैभवला सांगितले की, ” आमची फलंदाजी संपल्यानंतर ब्रेकच्या वेळेला मी संघाला सांगितले की या खेळपट्टीवर 195 हा नक्कीच चांगला स्कोर आहे. आम्ही चार फिरकी गोलंदाज आणि फक्त एक वेगवान गोलंदाजांसह खेळत होतो. आम्हाला खात्री होती की आमच्या फिरकीपटूंची मोठी भूमिका असेल. आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावर मी आनंदी आहे. याशिवाय आजच्या सामन्यासाठी आम्ही डावपेच बदल केला. आम्ही शाहरुख खानऐवजी डाव्या हाताचा फलंदाज प्रदोषला आणले. ती चाल चांगली झाली. दबावाखाली त्याने उपयुक्त 31 धावा केल्या.”

बाबा इंद्रजित (PC: Juili Ballal/Thanevaibhav)

 

 

 

 

 

 

 

 

आपली फलंदाजी आणि संघाच्या कामगिरीबद्दल विचारल्यावर बाबा इंद्रजीथ म्हणाला, “या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी या स्पर्धेत खेळले गेलेले मागील पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सकाळी थोडी ओलसर होती. परिस्थिती आव्हानात्मक होती. तरीही मी भागीदारी उभारण्यावर लक्ष केंद्रित केले होते. जेव्हा मी मैदानावर होतो तेव्हा मी डीके (दिनेश कार्तिक) यांच्याशी संवाद साधत होतो. आत बसून त्यानी मला सांगितले कि मी बरोबर फलंदाजी करत होतो. मी बऱ्याच स्पष्टतेनी खेळलो. तसेच या सामन्यात मला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली त्यामुळे मला जबाबदारीने फलंदाजी करणे भाग होते.”

या रोमांचक सामन्यानी आलेल्या क्रिकेट चाहत्यांना खूप आनंद दिला. इंद्रजित म्हणाला, “खेळ सी-सॉ सारखा चालू होता. कधी आम्ही वर होतो तर कधी ते. रजत आणि व्यंकटेशच्या भागीदारीमुळे आम्हाला दडपण आले पण डीके आम्हाला सांगत राहिला की जर आम्ही त्यांना लक्ष्याच्या ५० धावा कमी बाद केले तर आम्ही सामना जिंकू शकतो. आज आम्ही खूप इंटेन्सिटीने खेळलो.”

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 5 डिसेंबरला बंगाल आणि पंजाब यांच्यात पुढचा आणि या ठिकाणचा शेवटचा सामना होणार आहे. बंगालकडे इशान पोरेल, अभिषेक पोरेल आणि आकाश दीप यांसारखे खेळाडू आहेत, तर पंजाबकडे अनमोलप्रीत सिंग, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, मनदीप सिंग, नेहल वढेरा आणि मयंक मार्कंडे हे खेळाडू आहेत.