सुदर्शन आणि वॉरियरचा तामिळनाडूच्या विजयात सिंहाचा वाटा

PC: Juili Ballal/Thanevaibhav

२५ नोव्हेंबर रोजी, विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गट इ संघ गोवा आणि तामिळनाडू एकमेकांशी भिडले. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू संघ आयपीएल सितार्यांनी भरले आहेत. सर्व ११ खेळाडू ही फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा खेळतात. दुसरीकडे, गोव्यात अर्जुन तेंडुलकर, सुयश प्रभुदेसाई आणि राहुल त्रिपाठी सारखे हे तीन आयपीएल खेळाडू आहेत.

गोवा आणि तामिळनाडू मधला सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळला गेला. खेळाच्या पहिल्या तासात वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली. पुढे जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतशी फलंदाजीसाठी परिस्थिती चांगली होत गेली. साई सुदर्शनच्या शानदार १२५ धावांच्या जोरावर तामिळनाडूने ५० षटकात २९६/८ केले. अखेरच्या षटकांत कार्तिकने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. या यष्टिरक्षक-फलंदाजने सहा चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी केली आणि शेवटी, त्याची खेळी दोन्ही संघांमधील फरक ठरली.

प्रत्युत्तरात गोव्याने ५० षटकांत २६३ धावा केल्या. स्नेहल कौठणकर (५५) आणि कृष्णमूर्ती सिद्धार्थ (६१) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. मात्र, त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला कारण त्यांच्या संघाला ३३ धावा कमी पडल्या. तामिळनाडूचा नवा चेंडू गोलंदाज संदीप वॉरियर हा चार विकेट घेऊन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याला साई किशोर आणि बाबा अपराजितच्या फिरकी गोलंदाजांच्या जोडीने प्रत्येकी दोन बळी घेऊन चांगली साथ दिली.

साई सुदर्शन  (PC: Juili Ballal/Thanevaibhav)

 

 

 

 

 

 

 

 

“आम्ही बोईसर येथे १० दिवस उत्कृष्ट सराव शिबिर केले. माझे लक्ष नेहमीच ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्यावर असते. लहानपणी, मला माईक हसी आणि जस्टिन लँगरची फलंदाजी पाहायला आवडायची. अलिकडच्या काळात मी वॉशिंग्टन सुंदरच्या फलंदाजीने प्रेरित झालो,” असे सामना संपल्यानंतर सुदर्शनने ठाणेवैभवला सांगितले.

तो पुढे म्हणाला, “आज वातावरण उष्ण आणि दमट होते. फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. तसेच गोव्याने चांगली गोलंदाजी केली. मला वाटते की आयपीएल दरम्यान मला मिळालेल्या एक्सपोजरने मला खूप मदत केली आहे. त्याचबरोबर मला एकदिवसीय क्रिकेट खेळायला खूप आवडतं कारण ते टी-२० आणि टेस्ट क्रिकेटचं सुंदर मिश्रण आहे.” या स्पर्धेची चांगली सुरुवात करणाऱ्या सुदर्शनचे यंदा विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचे ध्येय आहे.

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पुढील सामना २७ नोव्हेंबरला बडोदा आणि नागालँड यांच्यात होणार आहे. सामना सकाळी ९ वाजता सुरू होईल.