स्वामी भक्तांनी महापालिका मुख्यालयास दिली धडक

घोडबंदरवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्यास विरोध

ठाणे: घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथे उभारण्यात आलेला स्वामी समर्थांचा मठ हलविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्याविरोधात स्वामी भक्त आक्रमक झाले असून त्यांनी ठामपा आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करून स्वामी नामाचा जप केला.

अखेरीस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि स्वामी भक्तांशी चर्चा करून मठ तोडणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर स्वामी भक्तांनी आपले आंदोलन मागे घेतले. आनंद नगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे. सुमारे 19 वर्षांपासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा मठ हलवून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मागील आठवड्यात हा मठ जमीनदोस्त करण्यासाठी महानगर पालिकेचे कर्मचारी गेले होते. त्यावेळेस मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठविले होते. शिवाय, अविनाश जाधव यांनीही मठाला भेट देऊन स्वामीभक्त म्हणून आपण कारवाईविरोधात उभे ठाकणार असल्याचे जाहीर केले होते. आज मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांच्यासह जवळपास तीनशे ते चारशे स्वामीभक्तांनी पालिकेवर धडक दिली. पालिका आयुक्तांनी भेट द्यावी, यासाठी दालनाबाहेरच स्वामी नामाचा जप सुरू केला. अखेरीस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन देण्यात आले.

याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की, स्वामींच्या कृपेमुळे आयुक्तांनी मठावरील कारवाई स्थगित केली आहे. मात्र मठाची ही जागा मठाच्या नावे कशी होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय, मठ हटविण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभे करू, असा इशारा दिला.