टी-२० इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
मुंबई : भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या शानदार फॉर्मात परतला आहे. सूर्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यातही वादळी अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह कर्णधाराने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
सूर्यकुमार यादवने क्रिकेटविश्वात इतिहास रचत असा विक्रम आपल्या नावावर केला, जो विराट कोहलीलाही टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत करता आला नव्हता. सध्या भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमारने हा टप्पा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या व अंतिम सामन्यात तिरुवनंतपुरम येथे गाठला.
या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या ३० चेंडूत ४ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची झंझावाती खेळी केली. २३३.३३ च्या स्ट्राइक रेटने सूर्याने या धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार धावा १९०० पेक्षा कमी चेंडूत पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारने केवळ १८२२ चेंडूत हा टप्पा गाठला. यापूर्वी हा विक्रम यूएईचा फलंदाज मोहम्मद वसीमच्या नावावर होता. वसीमने १९४७ चेंडूत ३ हजार टी-२० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. सूर्यकुमारने हा विक्रम मोडत नवा इतिहास घडवला.
भारतीय खेळाडूंमध्ये याआधी हा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने २१४९ चेंडूत ३ हजार धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीने २१६९ चेंडूत ३ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. आता रोहित-विराटनंतर सूर्यकुमार यादव हा टी-२० मध्ये ३ हजार धावांचा आकडा गाठणारा तिसरा खेळाडू ठरला.
सर्वात जलद ३००० टी-२० धावा करणारे फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)
१८२२ चेंडू – सूर्यकुमार यादव (भारत)
१९४७ चेंडू – मुहम्मद वसीम (यूएई)
२०६८ चेंडू – जोस बटलर (इंग्लंड)
२०७७ चेंडू – आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया)
२११३ चेंडू – डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)