फुटबॉल टर्फ व जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले करा-सरनाईक
ठाणे: ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.
मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाऊन पार्क, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नागला बंदर खाडी सुशोभीकरण, क्रीडा सुविधा, रस्ते विकास, पॉड टॅक्सी, चौकांचे सुशोभीकरण आदी विविध प्रकल्पांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
“ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडविणारी विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मेट्रो प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, वन विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच विविध संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहरातील मेट्रो अलाइनमेंट आणि रस्ते विकासकामांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित मेट्रो अलाइनमेंटमुळे परिसरातील संरचनांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे तांत्रिक सर्वेक्षण करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. संबंधित भागात प्रत्यक्ष मार्किंग, सर्व यंत्रणांची संयुक्त पाहणी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पारदर्शक पद्धतीने प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. रस्ते विकासकामांदरम्यान भूमिगत वीज केबलचे नुकसान होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय साधावा, अशा सूचना देण्यात आल्या. हिरानंदानी परिसरातील प्रलंबित संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले.
वाघबीळ येथील प्रस्तावित शूटिंग रेंज प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सुमारे २६ ते २७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी आवश्यक अंदाजपत्रक व शासन मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. ५० मीटर मानकांनुसार तीन मजली अत्याधुनिक शूटिंग रेंज उभारण्याचे नियोजन असून, मंजूर निधीनुसार शूटिंग रेंज, ऑडिटोरियम तसेच अन्य प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत, असे सरनाईक यांनी सांगितले.
महापालिकेच्या यापुढील नव्या प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी जागा राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. वनस्पती उद्यानाच्या विकासासाठी तज्ज्ञ डिझायनरमार्फत आकर्षक व भविष्यवेधी आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
शहरातील फुटबॉल टर्फ, पिकलबॉल कोर्ट आणि जलतरण तलाव यांसारख्या क्रीडा सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर सरनाईक यांनी भर दिला. विशेषतः फुटबॉल टर्फ आणि जलतरण तलाव दिवाळीपूर्वी नागरिकांसाठी खुले करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, कार्यादेश आणि हस्तांतरणाची कार्यवाही कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
धर्मादाय भवन, प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र, विविध सार्वजनिक इमारती तसेच प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. विकासकामांमध्ये न्यायालयीन अथवा प्रशासकीय अडथळे असल्यास आवश्यक कायदेशीर कार्यवाही गतीने पूर्ण करून ते दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहरातील चौकांचे सुशोभीकरण, उद्यानांची नियमित देखभाल, महापुरुषांच्या पुतळ्यांचे संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या.
महापालिकेच्या मालमत्तांचे मूल्यवर्धन करून महसुलाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी ‘लँड मॉनेटायझेशन पॉलिसी’ आणि ‘ईओआय’ प्रक्रियेद्वारे नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
प्रस्तावित पॉड टॅक्सी प्रकल्पाबाबत आवश्यक तांत्रिक मानके, व्यवहार्यता अहवाल, सामाजिक परिणामांचा अभ्यास आणि प्रस्तावित रिंग मेट्रोशी समन्वय साधून अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वतंत्र तांत्रिक सल्लागार संस्थेमार्फत व्यवहार्यता अहवालाचे पुनर्मूल्यांकन करून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.