उल्हासनगरमध्ये सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालय सेवेत दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

उल्हासनगर : कोविडच्या काळात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगर-१ भागातील अन्टेलिया शहाड-कल्याण-मुरबाड रोड येथे उल्हासनगर महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले होते. या रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात करण्यात आले असून त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

या ठिकाणी विविध आधुनिक आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध असणार असून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच उल्हासनगर येथे उभारण्यात आलेले हे रुग्णालय अगदी फाईव्ह स्टार रुग्णालयांना लाजवेल असे रुग्णालय असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या गेलेल्या कोविड हॉस्पिटलचे कायमस्वरुपीच्या एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून या रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरु होते. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले असून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. उल्हासनगर येथे उभारण्यात आलेले हे रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना आशादायी ठरणार आहे. या रुग्णालयाचा फायदा हा केवळ उल्हासनगरच नव्हे हा आसपासच्या शहरातील नागरिकांनाही होणार असून तातडीच्या उपचारासाठी नागरिकांना ठाण्याला जावे लागणार नसल्याचे ही मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, माजी महापौर लीलाताई आशान, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यसह विविध मान्यवर उपस्थित होते.

उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशिलिटी रुग्णालयात आपल्याला एकही रुपया खर्च न करता मोफत उपचार मिळणार आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये कुठेही कॅश कांऊटर नावाचा बोर्ड नाही, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उदघाटन कार्यक्रमावेळी दिली. येत्या काळात उल्हासनगर येथील कामगार हॉस्पिटल हे कामगारांसाठी लवकरच खुलं केलं जाईल. सध्या त्या हॉस्पिटलमधील १०० बेडची तरतूद केली जाणार आहे पण गरज लक्षात घेऊन याच बेडची संख्या ३०० पर्यंत जाणार असल्याचेही खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले.

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कॅशलेस सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये ३२ आयसीयू बेड्स सह २०० बेड्स आहेत. तर हे भव्य हॉस्पिटल “नो कॅश काऊंटर” तत्वावर पिवळ्या व केशरी रेशनधारकांना मोफत आरोग्य सुविधा देणार आहे. या हॉस्पिटलमध्ये एक्सरे, सिटी स्कॅन, २ डी इको, सोनोग्राफी व कॅथलॅबसह ५ सुसज्ज ऑपरेशन थिएटरदेखील याठिकाणी असणार आहेत. तसेच हृदय, मेंदू, पोट आणि कॅन्सरसारख्या प्रमुख ४६ गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया व इतर १२०० विविध शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत होणार आहे. खासगी हॉस्पिटल्सप्रमाणे २४ तास डॉक्टर उपलब्धता, वातानुकूलित सुविधा, रुग्णाला ३ वेळेचा पौष्टिक आहारही दिला जाणार आहे.