ठाणे: सर्वसाधारणपणे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते.
उद्या गुरुवार ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असे आहे.
ज्यावेळी वेधशाळा नव्हत्या, कृत्रिम उपग्रह नव्हते तेव्हापासून शेतकरी पंचांगातील पर्जन्य नक्षत्र वाहनांवरून पावसाचा अंदाज जाणून घ्यायचे. हे अंदाज कधी बरोबर यायचे तर कधी चुकायचे. आता मात्र आधुनिक वेधशाळांचे अंदाज बरेचसे अचूक येतात, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी बोलतांना पर्जन्य नक्षत्रांची वाहने कशी ठरविली जातात तेही त्यानी स्पष्ट केले. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील, त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी. त्यासंख्येस नऊने भागावे. बाकी राहील त्यावरून वाहन ओळखावे. १. घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा, ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस, ८ गाढव आणि शून्य बाकी राहिली तर हत्ती वाहन समजले जाते. घोडा वाहन असता पर्वतावर पाऊस पडेल. कोल्हा, मेंढा वाहन असता पाऊस अत्यल्प पडेल. मोर, गाढव आणि उंदीर वाहन असता अल्प व अनियमित पाऊस पडेल. बेडूक, म्हैस आणि हत्ती वाहन असता जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असे सांगण्यात आले आहे.
सूर्यनक्षत्रप्रवेश आणि वाहने
मृग नक्षत्र गुरुवार ८ जून सायंकाळी ६-५२ वाजता हत्ती या वाहनावरून प्रवेश करणार आहे. आर्द्रा नक्षत्र गुरुवार २२ जून सायंकाळी ५-४७ वाजता मेंढा या वाहनावरून प्रवेश करणार आहे. पुनर्वसू नक्षत्र गुरुवार ६ जुलै सायंकाळी ५-२५ वाजता वाहन गाढव, पुष्य नक्षत्र गुरुवार २० जुलै सायंकाळी ४-५४ वाजता वाहन बेडूक, आश्लेषा नक्षत्र गुरुवार ३ ॲागस्ट दुपारी ३-५१ वाजता वाहन म्हैस, मघा नक्षत्र गुरुवार १७ ॲागस्ट दुपारी १-३२ वाजता वाहन घोडा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र गुरुवार ३१ ॲागस्ट सकाळी ९-३०वाजता वाहन मोर, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र बुधवार १३ सप्टेंबर उत्तररात्री ३-२४ वाजता वाहन हत्ती, हस्त नक्षत्र बुधवार २७ सप्टेंबर सायंकाळी ६-५४ वाजता वाहन बेडूक, चित्रा नक्षत्र बुधवार ११ ऑक्टोबर सकाळी ७-५८ वाजता वाहन उंदीर आणि स्वाती नक्षत्र मंगळवार २४ आक्टोबर रोजी सायंकाळी ६-२५ वाजता घोडा या वाहनावरून प्रवेश करणार आहे. पंचांगाप्रमाणे यावर्षी सर्वसाधारणपणे सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सासू-सुनांचा…तरणा-म्हातारा पाऊस
प्राचीनकाळी शेतक-यांनी पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणा-या पावसाप्रमाणे गमतीशीर नावेही ठेवली आहेत. पुनर्वसू नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘तरणा पाऊस‘ म्हणतात, तर पुष्य नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘म्हातारा पाऊस‘ म्हणतात. आश्लेषा नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘आसळकाचा पाऊस‘ म्हणतात. मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो म्हणून मघा नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘सासूंचा पाऊस‘ म्हणतात तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘सूनांचा पाऊस‘ म्हणतात. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘रब्बीचा पाऊस‘ म्हणतात. हस्त नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘हत्तीचा पाऊस‘ असे म्हणतात. चित्रा नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘आंधळीचा पाऊस‘ म्हणतात असेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.