सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार!

अर्थखात्यासाठी मोठी रस्सीखेच

मुंबई: अजित पवार यांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर टाकण्यात आली असून ही पद स्वीकारण्यास त्या तयार झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शनिवारी दुपारी बैठक होणार असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी करण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुखपदही त्यांच्याकडेच राहावं यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते.

पक्षाकडून होत असलेल्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्रिपद स्वीकरण्यास तयार झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर पाच बड्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाल्याची माहिती आहे. शनिवारी संध्याकाळी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार असल्याचे कळते.

अर्थखातं राष्ट्रवादीकडे ठेवण्यासाठी हालचाल

अजित पवार यांच्याकडे अर्थखातं, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खातं होतं. ही महत्त्वाची खाती कुणाला द्यायची यावरही खलबतं केली जात आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचं असलेलं अर्थखातं हे आपल्याकडेच राहावं असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बंद दाराआड तब्बल 45 मिनिटांहून अधिक चर्चा झाल्याची माहिती आहे.