मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

ठाणे: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा-मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड-माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. यामुळे ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ-ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील. ठाणे-वाशी/नेरुळ)पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली-गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मेगा ब्लॉक असेल. यामुळे ब्लॉक कालावधीत गोरेगाव-बोरिवलीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येतील. तर, अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.