साखर उत्पादनात महाराष्ट्राची गोडी वाढली!

सात जानेवारीपर्यंत ५५.३५ लाख टन साखर उत्पादन

मुंबई : राज्यात उसाच्या गळीत हंगामाने वेग घेतला आहे. चालू हंगामात ९८ सहकारी आणि ९९ खासगी, असे एकूण १९७ कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. बुधवारी, सात जानेवारीपर्यंत ५५.३५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

राज्यात १५ नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरू झाला. कारखान्यांची गाळप क्षमता वाढली आहे. मजुरांसह यांत्रिकीकरणाद्वारे ऊसतोडणी सुरू आहे. १९७ कारखाने प्रति दिन सरासरी दहा लाख टन क्षमतेने गाळप करीत आहेत. आजवर कारखान्यांनी एकूण ६२३.८३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. अपेक्षित थंडीही पडल्यामुळे चांगला साखर उतारा मिळत असून, ८.८७ टक्के साखर उताऱ्यासह ५५.३५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागाने १३५ लाख टन ऊस गाळप करून सर्वाधिक १४.१६ लाख टन साखर उत्पादन केले आहे. पुणे विभागाने १४५ लाख टन ऊस गाळप करून १३.२७ लाख टन, सोलापूर विभागाने १३६ लाख टन ऊस गाळप करून १०.८५ लाख टन, अहिल्यानगर विभागाने ६.४० लाख टन, छत्रपती संभाजीनगर विभागाने ४.४९ लाख टन, नांदेड विभागाने ५.५२ लाख टन, अमरावती विभागाने ५.६८ लाख टन आणि नागपूर विभागाने २९ हजार टन साखर उत्पादन केले आहे.

राज्याचा साखर उद्योग शेतकरी, सरकार आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. साखर उद्योगातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. हा हंगाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो, साखर, अल्कोहोल, इथेनॉल व वीज निर्मितीमुळे देशाच्या अन्न सुरक्षा व ऊर्जा सुरक्षेमध्ये योगदान देतो, ज्यामुळे तो देशाच्या कृषी-आधारित अर्थव्यवस्थेचा कणा ठरला आहे. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक ही प्रमुख साखर उत्पादक राज्ये आहेत. या राज्यांच्या अर्थव्यवस्थेत साखर उद्योगाचा वाटा मोठा आहे.