पोलिसांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा खडा पहारा
बदलापूर : बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाल्यानंतर, सर्व ईव्हीएम मशिन्स आदर्श शाळेतील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. सुमारे ६१९ मशीन कडक सुरक्षा व्यवस्थेखाली ठेवण्यात आल्या असून संपूर्ण परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून २४ तास लक्ष ठेवले जात आहे. स्ट्रॉंग रूमच्या सभोवताली पोलिसांचा कडक पहारा तैनात करण्यात आला आहे. सर्व प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या देखरेखीखाली पूर्ण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बुधवार ३ डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर करण्यात आली. तथापि शहरातील सहा प्रभागांना मतदानासाठी स्थगिती मिळाली. त्यातील एक प्रभाग बिनविरोध झाल्याने उर्वरित पाच प्रभागांमध्ये, २० डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने, २ डिसेम्बर रोजी झालेले मतदान व २० डिसेंबरला होणारे मतदान या दोन्ही मतांची मतमोजणी ही एकाच दिवशी २१ डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे काल मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर, २१ डिसेंबरपर्यंत यंत्रे सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्या अनुषंगाने निवडणूक आयोग व प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे.
मतमोजणीपर्यंत सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत राहणार आहेत. सुरक्षा रचनेत राज्य राखीव पोलीस तसेच स्थानिक पोलिसांचा १८ शिफ्टमध्ये तैनात केलेला फोर्स आणि प्रवेशद्वारांवर अतिरिक्त पहारा अशी त्रिस्तरीय व्यवस्था करण्यात आली आहे. या काळात विविध राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी देखील नियमानुसार पर्यवेक्षणासाठी उपस्थित राहू शकणार आहेत.