उबाठा आणि मनसेकडून लावण्यात आलेले बॅनर काढले
ठाणे: मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूनी विजयाचा जल्लोष करण्यासाठी मुंबईत उद्या शनिवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघावेत यासाठी दोन्ही पक्षांनी ठाण्यात जोरदार तयारी केली आहे. दरम्यान दोन्ही पक्षांकडून ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आले आहेत.
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. हिंदी सक्ती चालणार नाही अशी घोषणा करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या विरोधात मोर्चाची हाक दिली होती. दोन्ही पक्षांकडून मोर्च्याची जोरदार मोर्चेबांधणीही करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधू यांच्याकडून उद्या शनिवारी भव्य विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याची मुंबईसह ठाण्यातही जोरदार तयारी सुरु आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही पक्षांकडून नोंदणी अभियान राबवण्यात येत असून मुंबईला जाण्यासाठी बसेसची देखील सुविधा करण्यात आली आहे.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ठाण्यात काही महत्वाच्या ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. या बॅनरच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते आणि मराठी माणसांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र हे बॅनर काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी चर्चा केली. तसेच उद्याच्या मेळाव्याबाबत नागरिकांशी संवाद साधला.