ठाण्यात ४३२ इमारती, क्लस्टर, एसआरए योजना प्रस्तावित
ठाणे: ठाणे महापालिका हद्दीत ४३२ नवीन इमारतींची तसेच क्लस्टर आणि एसआरएची कामे असल्याने पुढील काळात ठाण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडी आणि इतर नागरी सुविधांच्या त्रासाला समोर जावे लागणार आहे.
महापालिकेने शहरात सुरु असलेल्या बांधकामाची माहिती नुकतीच जाहीर केली असून क्लस्टर आणि एसआरएसारख्या योजनांमुळे देखिल शहरात निवासी आणि वाणिज्य इमारतींची भर पडणार आहे, त्यामुळे नागरी सुविधांवरील ताण वाढण्याची देखिल शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील रस्ते अरुंद आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यावरील ताण वाढला असताना या नवीन इमारतींमध्ये रहिवासी राहण्यास येणार आहेत. त्यांच्याकडे घरटी एक तरी गाडी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संपूर्ण ठाणे शहरात मलनिस्सारण योजनेचे १००टक्के काम पूर्ण झालेले नाही तसेच ठाण्याची स्वतःची पाणी योजना नाही. सध्या अनेक भागात पाणीटंचाईचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. या इमारती तयार झाल्यानंतर आणखी पाणी टंचाई तीव्र होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महापालिकेला सक्षम करावी लागेल. त्याचबरोबर इतर नागरी सुविधा देखिल ठाणेकरांना द्याव्या लागतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
शहरात वाहन तळांची मोठी समस्या आहे, ती देखिल दूर करावी. घनकचरा विल्हेवाट, मार्केट, मैदान त्याचबरोबर शासकीय रुग्णालये आणि इतर सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
शहरातील निम्मी लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. त्यांचा देखिल पुनर्विकास भविष्यात होणार आहे. अनेक आरक्षित तसेच सुविधा भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. त्याचा देखिल महापालिकेला विचार करावा लागणार आहे. वाढते नागरिकरण हे भविष्यात ठाण्याची डोकेदुखी ठरण्याची शक्यात देखिल व्यक्त केली जात आहे.