भाईंदर- ‘गोमाता’ ही राज्यमाता असताना, तिच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी नयानगर (मिरा रोड) येथील मुस्लिम बांधवांनी (कुरेशी समाज) एकमुखी निर्णय घेत परिसरात गोमांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मुस्लिम समुदायाने घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नयानगरमध्ये येऊन या निर्णयाचे कौतुक केले.
नयानगर परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज वास्तव्यास आहे. काही समाजकंटकांकडून गोमांस तस्करीच्या घटना घडवून या परिसराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सातत्याने होत होता. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी परिसरातील वरिष्ठ मुस्लिम बांधवांनी (कुरेशी समाज) एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत “नयानगर परिसरात कोणत्याही प्रकारे गोमांस विक्री होऊ देणार नाही” असा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, जर कोणी हा नियम मोडला तर त्याच्यावर केवळ कायदेशीर कारवाईच नाही, तर मुस्लिम बांधव स्वतः पुढाकार घेऊन अशा प्रवृत्तींना आळा घालतील, असा कडक इशाराही समुदायाने दिला आहे.
या कौतुकास्पद निर्णयाची दखल घेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी हैदरी चौक, नयानगर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे अभिनंदन करत त्यांना ‘गोमातेची प्रतिकृती’ भेट स्वरूप देत त्यांचा गौरव केला.