५० वर्षे स्पर्धा सुरू ठेवणे सोपे नाही – रेपाळे

ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धेचे उद्घाटन

ठाणे: ‘पन्नास वर्षे एखादी स्पर्धा सुरू ठेवणे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट असून ‘ठाणेवैभव’ने नोंदवलेली ही कामगिरी नेत्रदीपक आहे, असे उद्गार मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य विकास रेपाळे यांनी काढले.

येथील सेंट्रल मैदानात ठाणेवैभव क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ श्री.रेपाळे यांच्या हस्ते झाला. स्पोर्टिंग कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांनीही ही स्पर्धा ५० वर्षे जवळून पाहिल्याचे सांगितले. ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी स्पर्धा सुरू करण्यामागची पार्श्वभूमी विषद करताना ‘ठाणेवैभव’कार नरेंद्र बल्लाळ आणि त्यांना साथ देणारे प्रभाकर गुजराथी यांचे स्मरण केले.

‘मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यात ‘ठाणेवैभव’ने क्रिकेटचे निरांजन लावले. आणि त्यामुळे येथील शेकडो क्रिकेटपटूंना क्रिकेटविश्वात प्रवेश करण्याची संधी मिळाली’, असे सांगितले. मुंबई क्रिकेट संघटनेने सुवर्ण महोत्सव पूर्ण करणाऱ्या ठाणेवैभव करंडकाला विशेष दर्जा द्यावा, असे श्री.बल्लाळ यांनी सूचित केले. श्री.रेपाळे यांनी त्यास दुजोरा दिला.

आजच्या ऐतिहासिक समारंभास असंख्य जुने-नवे खेळाडू उपस्थित होते. मकरंद सातघरे, पंडित, भाई तावडे, सतीश नाचणे, अतुल फणसे, सह्याजीराव सतीश चाफेकर, ॲड.शेखर भिसे, रवी पालकर, शिरीष साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आणि समालोचक जुईली बल्लाळ-कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

ज्या मैदानात या स्पर्धेचा पहिला चेंडू टाकण्यात आला, त्या मैदानात ५० वे वर्ष सुरू झाले. पहिल्या स्पर्धेच्या शुभारंभास नामवंत क्रिकेटपटू खंडू रांगणेकर, तत्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान, नटवर्य मामा पेंडसे, श्री.नरेंद्र बल्लाळ आणि प्रभाकर गुजराथी उपस्थित होते.