ई-गव्हर्नन्सबाबत मीरा-भाईंदर पालिकेला राज्यस्तरीय पुरस्कार

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेने ई-गव्हर्नन्स (ई-ऑफिस) क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व प्रभावी कार्याची दखल घेत, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत महापालिकेस तृतीय क्रमांकाचा मान प्रदान करण्यात आला आहे.

राज्यातील एकूण २९ महापालिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, त्यामधून मीरा-भाईंदर महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी करत हा मान पटकावला आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना हा
पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिस्टम मॅनेजर राज घरत उपस्थित होते.

मीरा-भाईंदर महानगरपालिका ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासन अधिक वेगवान, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असून, केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत एनआयसीद्वारे विकसित ई-ऑफिस प्रणाली महापालिकेत यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. अवघ्या ६० दिवसांत सर्व विभागांमध्ये १००टक्के ई-ऑफिस अमलात आणणारी मीरा-भाईंदर महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली असून या उपक्रमास एनआयसीकडून प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.

ई-ऑफिस प्रणालीमुळे महानगरपालिकेतील दैनंदिन कामकाज, पत्रव्यवहार, फाईल हालचाल, मंजुरी प्रक्रिया तसेच नोंद व्यवस्थापन पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पार पडत आहे. यामुळे माहिती सुरक्षित, शोधण्यायोग्य व तत्काळ उपलब्ध होत असून कामकाज अधिक सुसूत्र व गतिमान झाले आहे. आतापर्यंत १.४९ लाखांहून अधिक प्राप्त नोंदी तसेच ८,८०० पेक्षा अधिक फाईल्स डिजिटल पद्धतीने हाताळण्यात आल्या असून प्राप्त नोंदींपैकी सुमारे ९० टक्के नोंदींचा निपटारा तीन दिवसांच्या आत होत आहे, तर फाईल निपटारा सरासरी सात दिवसांत पूर्ण केला जात आहे.