ठाण्यात कचरा डब्यांचा घोटाळा, काँग्रेसची चौकशीची मागणी
ठाणे: लाखो रुपयांचा खर्च करून बसविण्यात आलेले स्टेनलेस स्टील कचरा डबे अल्पावधीतच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, अनेक ठिकाणी फक्त लोखंडी स्टँड उभे असल्याने या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील विविध भागात सुस्थितीत असलेले अनेक कचरा डबे अयोग्य पद्धतीने बसविल्यामुळे उखडून रस्त्याच्या कडेला व पदपथांवर पडून आहेत. तरीदेखील प्रशासनाकडून याकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या संतापात भर घालत आहे. करदात्यांच्या पैशाचा होत असलेला हा उघड अपव्यय थांबवण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी केली आहे.
याबाबत स्मार्ट सिटी, आमदार निधी, खासदार निधी आदी विविध स्रोतांमधून बसविण्यात आलेल्या सर्व कचरा डब्यांचे फिजिकल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील पाच वर्षांतील खर्च, डब्यांची गुणवत्ता, तसेच प्रत्यक्षात ते डबे संबंधित ठिकाणी अस्तित्वात आहेत की नाहीत, याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, शहरभर विखुरलेले व पडून असलेले स्टील कचरा डबे तातडीने संकलित करून आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा बसवावेत, तसेच भविष्यात गरजेनुसारच डबे बसविण्याचे धोरण राबवावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. संबंधित विभागांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शहरभर पडून असलेले स्टील कचरा डबे एकत्र करून महानगरपालिका मुख्यालयासमोर टाकत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पिंगळे यांनी दिला आहे.